महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्णयानुसार येत्या सोमवारी ३ मार्चला रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्यावतीने महायुती सरकारविरोधात रत्नागिरीत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनेष राऊत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हारीस शेकासन यांनी दिली. याबाबतची माहिती देताना हारीस शेकासन यांनी सांगितले की, शेतकऱ्यांमध्ये व मच्छीमारांमध्ये राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना. कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्याची पूर्ततेसाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न सुरू असल्याचे दिसत नाही. सत्तेत येण्या करिता आश्वासनांचा पाऊस पाडून सत्तेत येताच महायुती सरकार शेतकऱ्यांकडे, मच्छीमारांकडे व सामान्य जनतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.
आरोग्यसेवा कोलमडली – रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली असून शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. अनेक पदे रिक्त आहेत, शिकाऊ डॉक्टर रुग्णांचा इलाज करत आहेत. महाराष्ट्र शासनाचा रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे. याचा जाब येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसचे आमदार सरकारला विचारणार आहेत.
लाक्षणिक उपोषण – सोमवार दिनांक ३ मार्च २०२५ पासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. शेतकऱ्यांच्या, मच्छीम ारांच्या व जनतेच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, असे हारीस शेकासन यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व माजी आमदार अॅड. हुस्नबानू खलिफे, रमेश कीर, सहदेव बेटकर, रूपाली सावंत, अनिरुद्ध कांबळे, रमेश शहा, टी. डी. पवार, विभावरी जाधव, हनीफ खलफे, अशोक जाधव, दीपक राऊत, अॅड. अश्विनी आगाशे व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या उपोषणात काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह काँग्रेसप्रेमी नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.