24.4 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024
HomeRatnagiriचौसोपी वाड्यातील ३७५ वर्षाची गणपतीची प्रथा

चौसोपी वाड्यातील ३७५ वर्षाची गणपतीची प्रथा

या उत्सवाने कोकणातील गणेशोत्सवाची सुरुवात होते अशी आख्यायिका आहे. गेली ३७५ वर्षे या उत्सवाची परंपरा कायम आहे.

प्रत्येक गावाप्रमाणे गणेशोत्सवाच्या वेगवेगळ्या कहाण्या, प्रथा आपण ऐकत अथवा वाचत असतो. आज आपण देवरुख येथील चौसोपी वाड्यातील ३७५ वर्षापासून सुरु असलेल्या गणपतीच्या प्रथेबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात सर्वच ठिकाणी गणेशाच्या मुर्तीची भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रतिष्ठापना केली जाते. मात्र श्रीकांत जोशी आणि चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला शुद्ध प्रतिपदेला सुरुवात होते. या उत्सवाने कोकणातील गणेशोत्सवाची सुरुवात होते अशी आख्यायिका आहे. गेली ३७५ वर्षे या उत्सवाची परंपरा कायम आहे.

सांगली जिल्ह्यात असणाऱ्या कांदे-मांगले या गावाहून इ.स.१७०० सालच्या दरम्यान देवरूखात आलेल्या भास्कर जोशी बीनबाळ जोशी यांचे थोरले चिरंजीव बाबा जोशी बीन भास्कर जोशी हेच देवरूखमधील श्री. सिद्धिविनायक या देवस्थानाचे आद्य संस्थापक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. बाबा जोशी हे गृहस्थाश्रमी म्हणून देवरूख येथे वास्तव्यास असताना त्यांना दुर्धर व्याधीने ग्रासले होते. त्यावर उपाययोजना म्हणून त्यांनी देवधामापूरमधील शंकराच्या जागृत देवस्थान व नंतर मोरगावातील मयुरेश्वराजवळ कडक उपासनेला सुरूवात केली. तेथे त्यांना दृष्टांतानुसार चांदीच्या डब्यात श्री सिध्दीविनायकाची नुकतीच पूजा केलेली मुर्ती सापडली. दृष्टांतानुसार ती मुर्ती त्यांनी देवरूखात आणली आणि चौसोपी वाड्यात त्याची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून दरवर्षी हा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व शुद्ध पंचमीला षष्ठी उजाडता संपतो.

कोकणातील गणेशोत्सवाचा आरंभ म्हणून प्रसिध्द असलेला तसेच भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा पाच दिवस चालणारा देवरूखच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला यावर्षी ७ सप्टेंबर पासून प्रारंभ होणार असून, नियमित गणेशोत्सवाआधी दोन दिवस आधी सुरू होणारा हा उत्सव गेली ३७५ वर्षे अखंडितपणे सुरू आहे. मागील दीड वर्षापासून आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी सुद्धा सर्व निर्बंधाचे पालन करून, साधेपणाने हा उत्सव साजरा केला जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular