शासकीय स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांची शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत रेशनकार्डधारकांच्या आर्थिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याची पडताळणी होणार आहे. एक लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असेल किंवा ती व्यक्ती विदेशी असेल तर त्यांचे रेशनकार्ड रद्द होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत मिळणाऱ्या सवलतीच्या धान्याचा लाभ प्राधान्य आणि अंत्योदय गटातील लाभार्थ्यांना दिला जात आहे; मात्र, योग्य लाभार्थ्यांपर्यंत धान्याचा लाभ पोहोचवण्यासठी अपात्र, दुबार स्थलांतरित, मयत लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार, १ एप्रिल ते ३१ मे २०२५ या कालावधीत अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम जिल्हाभरात राबवण्यात येत आहे. त्यानुसार शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे.
यासाठी रेशनदुकानदार यांच्यामार्फत शिधापत्रिका तपासणी नमुना विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार, रेशनकार्डधारकांच्या माहितीचा अर्ज सर्व कागदपत्रांसह ३० एप्रिलपर्यंत क्षेत्रीय कार्यालयाकडे द्यावा लागणार आहे. अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी उत्पन्नाचा दाखला या शोधमोहिमेत तपासला जाणार आहे. उत्पन्न अधिक असल्यास त्या लाभार्थ्यांचा लाभ रद्द होणार आहे. विदेशी व्यक्तींना रेशनकार्ड दिले जाणार नाही. त्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र पाहिले जाणार आहे.
पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ – पात्र लाभाथ्यांना शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, या हेतूने दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्तींची नावे वगळण्यात येणार आहेत. ही मोहीम ३१ मेपर्यंत राबवण्यात येणार आहे. यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभाच्यर्थ्यांना मिळणार आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे रोहिणी रजपूत यांनी सांगितले.