संगमेश्वरनजीकच्या शास्त्रीपूल येथील धोकादायक दरड शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कोसळली. स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार निवेदने देऊनही संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने, मोठी जीवितहानी टळली असली तरी एका महिलेस किरकोळ दुखापत झाली असून एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. दरड कोसळल्यानंतर काहीकाळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरच रोष व्यक्त करत ठेकेदार व महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थांनी या दरडीच्या संभाव्य धोकाविषयी पूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते; मात्र, चौपदरीकरणाच्या कामात डोंगर कापण्याच्या प्रक्रियेत सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे अशा अपघातासारख्या घटनांना निमंत्रण मिळते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
संबंधित ठेकेदार व महामार्ग विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष या घटनेला कारणीभूत ठरले आहे. यापुढील संभाव्य अपघात टाळण्यासाठी संगमेश्वर एसटी स्थानक ते शास्त्री पुलादरम्यान धोकादायक ठिकाणी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरड कोसळल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील शास्त्री पुल येथे वाहनांच्या दुतर्फी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. छोटी वाहने असुर्डे-संगमेश्वर बाजारपेठमार्गे वळवल्याने संगमेश्वर बाजारपेठेतदेखील वाहतूककोंडी पाहायला मिळाली. संगमेश्वरनजीक महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
उपाययोजना करा – संभाव्य अपघात टाळण्यासाठी संगमेश्वर एसटी स्थानक ते शास्त्री पुलादरम्यान धोकादायक ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.