जिल्हयाला बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने झोडपले. मात्र मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे जनजीवन सुरळीत सुरू होते. दरम्यान संगमेश्वरमध्ये गटारे तुंबल्याने त्याचे पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली नसली तरी वाहनचालकांना या पाण्यातून कसरती करत वाहने हाकावी लागत होती. त्यामुळे वेग मंदावला होता. दरम्यान दोन्ही दिवसांमध्ये कोठेही जिवीतहानी झालेली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून अनेक भागांत वीजपुरवठा अजूनही सुरळीत झालेला नाही. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात २१ मे २३ मे या कालावधीत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र बुधवारी हवामान विभागाने कोकणात रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत ताशी ५० ते ६० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छिमारांना आवाहन वादळी पावसाच्या शक्यतेमुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. अनेकठिकाणी समुद्र खवळलेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार मंगळवारी दुपारनंतर जिल्ह्याला मान्सूनपूर्व वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मंगळवारी सायंकाळनंतर-पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. रात्री तो ओसरला. बुधवारी सकाळपर्यंत त्याने विश्रांती घेतली. मात्र मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसाचे परिणाम बुधवारी दिसून आले. मान्सूनपूर्व वादळी पावसाने जिल्ह्याच्या अनेक भागात प्रचंड नासाडी केली. मंगळवार पासून बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात ४४ च्या सरासरीने ३९७ मिमी ‘पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. यात मंडणगड तालुक्यात २९.०० मिमी, खेड ४३.४२ मिमी, दापोली ३४.८५ मिमी, चिपळून ३३.८८ मिमी, गुहागर-३८.२० मिमी, संगमेश्वर ६०.७५. मिमी, रत्नागिरी ७४.०० मिमी, लांजा ३८.८० मिमी आणि राजापूर तालुक्यात ४४.६२ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.
संगमेश्वरमध्ये रस्त्यावर माती आणि पाणी – मंगळवारी धो-धो कोसळलेल्या पावसामुळे चोंदलेल्या गटारांमुळे पाणी तुंबले आणि ते रस्त्यावर आले. त्याचबरोबर प्लॅस्टिकचा कचरा आणि मोठ्या प्रमाणावर माती रस्त्यावर आली होती. शास्त्रीपूल परिसरात आलेल्या या पाण्यामुळे आणि मातीमुळे अनेक वाहनचालकांना पर्जन्यमान वर्तवण्यात बुधवारी त्याचा फटका बसला.
४ दिवस पावसाचा अंदाज – बुधवारी सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र दुपारनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. पुढील चार दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. २३ मेव २४ मे रोजी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार होण्याची शक्यता आली आहे. या कालावधीत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. आपत्ती काळात जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३५२) २२२२३३ / २२६२४८ किंवा पोलीस ‘हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.
काळजी घेण्याचे आवाहन – या कालावधीत वीज चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. वीज चमकंत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब रहावे. वीज चमकत अंसताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. वीज चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी अॅप’ डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे, अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.