कोणाचेही नुकसान न करता नागरिकांच्या हरकती लक्षात घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्यात अत्यावश्यक बदल केले जातील, असे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी कुवे ग्रामस्थांना दिले. कुवे येथील डम्पिंग ग्राऊंडची जागेवर जाऊन पाहणी करत मुख्याधिकाऱ्यांना १५ दिवसांत जागा स्थलांतरित करण्याची सूचना आमदार सामंत यांनी दिली. शहर विकास आराखड्याबाबत समस्या, कुवे येथील डम्पिंग ग्राऊंड व नगरपंचायत कार्यक्षेत्रात मृत्यू दाखल्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवश्यक असणारे वैद्यकीय प्रमाणपत्र अट रद्द करण्यात यावी, या मागणीसंदर्भात आमदार किरण सामंत यांची भेट घेत सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी कुवे ग्रामस्थांनी आमदार सामंत यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. कुवे येथील महामार्गावर असणारे डम्पिंग गेली दोन वर्षे सुरू आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या आजूबाजूला लोकवस्ती व लोकांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.
आम्ही वारंवार मागणी करूनही काही कार्यवाही होत नाही. त्यामुळे डम्पिंग ग्राउंड त्वरित स्थलांतरित करावे, तसेच लांजा ग्रामपंचायत व कुवे ग्रामपंचायत मिळून लांजा नगरपंचायत स्थापन झाली; परंतु स्थापन होताना लांजा-कुवे न होता फक्त लांजा नगरपंचायत असे नामकरण करण्यात आले. त्याचप्रमाणे लांजा-कुवे नगरपंचायत कार्यक्षेत्रात मृत्यूदाखला नोंदणी करण्यासाठी सर्व मृत्यू नोंदीकरिता वैद्यकीय प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. अपघाती किंवा दवाखान्यात मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणे शक्य होते; परंतु नैसर्गिक किंवा व वृद्धापकाळाने झालेल्या मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवणे जिकिरीचे होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या झालेल्यांना मृत्यूदाखला नोंदणीसाठी नगरसेवक किंवा पोलिस पाटील यांचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
विकास आराखडा पूर्णत्वास नेताना कोणावरही अन्याय केला जाणार नाही. सर्वांच्या हरकती लक्षात घेऊन आणि जनतेला विश्वासात घेऊनच विकास आराखड्यासंदर्भात निर्णय घेतले जातील. सर्वसामान्य जनतेचे नुकसान करून हा विकास आराखडा करण्यात येणार नाही. सर्वांचा योग्य तो न्याय दिला जाईल, असे आश्वासन आमदार सामंत यांनी दिले. चर्चेदरम्यान शासकीय अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी विविध प्रश्न अधिकाऱ्यांसमोर मांडले. तसेच आमदार किरण सामंत यांनी कुवे येथील डम्पिंग ग्राऊंडची जागेवर जाऊन पाहणी करत मुख्याधिकारी तुषार बाबर यांना जागा १५ दिवसांत स्थलांतरित करण्यात यावी, अशी सूचना केली.
ग्रामस्थांकडून समाधान – आमदार किरण सामंत यांनी कुवे येथील डम्पिंग ग्राऊंडची जागेवर जाऊन पाहणी करत मुख्याधिकारी तुषार बाबर यांना जागा १५ दिवसांत स्थलांतरित करण्यात यावी, अशी सूचना केली. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याबद्दल कुवे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.