रत्नागिरी शहराबरोबरच किनारपट्टी भागाच्या विकासावरही लक्ष देण्यात येत असून, पर्यटनस्थळ म्हणून भाट्ये किनाऱ्याचाही विकास होणार आहे. भाट्ये पूल ते झरी विनायक मंदिरदरम्यान पर्यटनाच्यादृष्टीने रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार असून, वॉकिंग ट्रॅकही उभारला जाणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात अनेक धार्मिक व निसर्गसौंदर्याने नटलेली स्थळे आहेत. येथील खाड्यांमधील निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे. रत्नागिरी मतदार संघातील श्रीक्षेत्र गणपतीपुळेच्या विकासासाठी विकास आराखडा, निवेंडी येथे होऊ घातलेले प्राणी संग्रहालय, बोटिंग प्रकल्प, रत्नागिरी शहरातील शिवसृष्टी, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, श्री विठ्ठल मूर्ती, थ्रीडी मल्टीमीडियासारख्या विविध उपक्रमांचा समावेश आहे. शहराजवळच असलेल्या भाट्ये गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील लढवय्या सेनानी मायाजी भाटकर यांची समाधी आहे.
याच गावाला एका बाजूला समुद्रकिनारा तर एका बाजूला खाडीने वेढलेले असून, या गावच्या सौंदर्यात भर टाकत आहे. समुद्रकिनाऱ्यावरील झरी विनायक मंदिरही भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. या किनाऱ्याचाही पर्यटनदृष्ट्या विकास केला जात आहे. पार्किंग व्यवस्था, समुद्रकिनारी पर्यटकांना कपडे बदलण्यासाठी सुविधा, किनाऱ्यावर विजेची सुविधा आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या गावात नारळ संशोधन केंद्र असून, या ठिकाणीही अनेक पर्यटक, अभ्यासू शेतकरी माहिती घेण्यासाठी येत असतात. भाट्ये गावातूनच पावसकडे जाणारा मार्ग असून सिंधुदुर्ग, राजापूलां जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. या रस्त्याला काही वर्षांत मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. भाट्ये किनाऱ्याच्या विकासाच्यादृष्टीने भाट्ये पूल ते झरी विनायक मंदिर रस्ता दीड किमी लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे.