कोत्रेवाडी येथील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणारा डंपिंग ग्राउंड प्रकल्प रद्द करण्यात यावा किंवा तो अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा यासाठी आम्ही नागरिकांच्या पाठीशी असून, जोपर्यंत तो रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा कायम चालू राहणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हा संघटक उल्का विश्वासराव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली सुरुवातीपासूनच आपण कोत्रेवाडी नागरिकांसोबत आहोत. ग्रामस्थांनी वारंवार मागणी, आंदोलने, उपोषणे करूनही कचरा प्रकल्प नगरपंचायतीने रद्द किंवा स्थलांतरित केलेला नाही.
म्हणूनच हा प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने ८ जुलैला लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत हा डंपिंग ग्राउंड प्रकल्प रद्द झाला पाहिजे, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, शिवसहकार सेनेचे जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, उपशहरप्रमुख मोहन तोडकरी, युवासेना तालुकाधिकारी अभिजित राजेशिर्के, उपतालुकाप्रमुख युवराज हांदे, माजी शहरप्रमुख नितीन शेट्ये आदी उपस्थित होते.
प्रदूषणात आम्हाला मारणार का ? – शासकीय निकषात बसत नसतानाही जबरदस्तीने डम्पिंग ग्राउंड प्रकल्प रेटून नेऊन आम्हा ग्रामस्थांना कचऱ्याच्या प्रदूषणात मारायचे आहे का? असा संतप्त सवाल कोत्रेवाडीतील महिलांनी केला आहे. लांजा नगरपंचायतीकडून कोत्रेवाडी येथे कचरा प्रकल्प प्रस्तावित आहे. या विरोधात कोत्रेवाडी ग्रामस्थ लढा देत आहेत. हा प्रकल्प रद्द करावा किवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. याबाबत कोत्रेवाडी ग्रामस्थांची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीत महिलांनी प्रकल्पविरोधात संताप व्यक्त केला. घरातील पुरुष मंडळी या वाडीला देशोधडीला लावणाऱ्या प्रकल्पाविरोधात गेल्या चार वर्षांपासून लढत असताना प्रशासन अशा चुकीच्या पद्धतीने काम का करत आहे? जर कुवे येथील शासकीय जागेतील कचरा टाकण्याचे प्रशासन बंद करत असेल तर आम्ही माणसे आहोत की नाही? आम्हाला कचऱ्याच्य धुरात, कचऱ्याच्या प्रदूषणात मारायचा नगरपंचायत प्रशासनाचा विचार आहे का? तसे असेल तर त्यांचा तो प्रयत्न आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेतला आहे.
भविष्यात तीव्र लढा उभारणार – मंगळवारी होणाऱ्या लाक्षणिक उपोषणानंतरही प्रशासनाने काहीच भूमिका घेतली नाही, तर भविष्यात हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय यावेळी ग्रामस्थांनी घेतला आहे.