तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या घरकुलाचे काम जोत्यापर्यंत पूर्ण झाल्यानंतर काही स्थानिकांनी जबरदस्तीने हे बांधकाम जमिनदोस्त केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लाभार्थ्यांचा मुलगा संदीप जनार्दन सुतार यांनी तहसीलदारांना निवेदन देत दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे तसेच न्याय न मिळाल्यास कुटुंबासह उपोषणा इशारा दिला आहे. जनार्दन सुतार यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून २०२४-२५ मध्ये घरकुल मंजूर झाले होते. कादवड, रामबाडी येथील दिलीप रघुनाथ शिंदे यांनी आपल्या आईच्या तोंडी संमतीने त्यांना शेतातील एक भाग घरकुलासाठी देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर शिंदे यांनी तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्राद्वारे लेखी संमतीही दिली होती. या आधारे प्रस्ताव मंजूर होऊन पहिला हप्ता १५ हजार रुपयेही खात्यात जमा झाला होता.
पुढे मनोहर विठोबा सुतार आणि दिलीप शिंदे यांनी या बांधकामाला विरोध सुरू केला. तोंडी धमक्या देत, घाबरवून ग्रामपंचायतीला अर्ज केले, प्रतिज्ञापत्र रद्द करण्याचा प्रयत्न केला. याबाबत विस्तार अधिकारी केळस्कर यांनी मध्यस्थी करून दोघांना समज दिली; पण तरीही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. ६ जुलैला संदीप सुतार यांच्या अनुपस्थितीत दिलीप शिंदे, मनोहर सुतार आणि त्यांच्या पत्नींसह आणलेल्या आठ-दहा मजुरांनी घराचे जोत्यापर्यंतचे बांधकाम उद्ध्वस्त केल्याचा आरोप निवेदनातून संदीप सुतार यांनी केला आहे. या कृत्यात सहभागी असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे अन्यथा आपल्या कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला आहे.