रेल्वे मार्गावर यंदापासून रो-रो कार सेवा सुरू होत आहे. त्यासाठीचे बुकिंग सुरू झाले असून १३ ऑगस्टपर्यंत ते सुरू राहणार आहे. मोटारी उपलब्धतेनुसार ११ सप्टेंबरपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. कोलाड (जि. रायगड) स्थानकात रेल्वे वॅगनमध्ये मोटारी चढवल्या जाणार असून, गोव्यातील वेर्णा स्थानकात त्या उतरविल्या जाणार आहेत. एका गाडीसाठी जीएसटीसह ७ हजार ८७५ रुपये भाडे असणार आहे. कोकण रेल्वेने १९९९ पासून मोठ्या ट्रकसाठी रो-रो सेवा सुरू केली होती. त्यानंतर यंदापासून रो-रो मोटार सेवा सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत मोटारीला फ्लॅटबेड रेल्वे वॅगनवर ठेवले जाईल आणि रेल्वेमार्गे ती कोलाडहून गोव्याच्या वेर्णा स्थानकापर्यंत पोहोचवली जाईल. कारमालक स्वतः प्रवास करत असताना आपली कारही सुरक्षितपणे नेली जाईल, असा विश्वास कोकण रेल्वेने दिला आहे. नवीन रो-रो कार सेवा २३ ऑगस्टपासून कोलाड रेल्वे स्टेशनवरून सुरू होईल, तर गोव्यातील वेर्णा रेल्वे स्टेशनवरून ही ट्रेन २४ ऑगस्टपासून सुरू होईल.
ही सेवा गणेशोत्सवामध्ये होणाऱ्या गर्दीच्या काळात उपयोगी ठरेल, असा दावा कोकण रेल्वेने केला आहे. ही सेवा केवळ गणेशोत्सव कालावधीपुरतीच ११ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. रो-रो कार सेवा एक दिवसाआड दोन्ही दिशांना म्हणजे, कोलाडहून वेर्णा आणि वेर्णा येथून कोलाडला धावेल. प्रवासाच्या तीन तास आधी म्हणजेच दुपारी दोन वाजता प्रवाशांना राहणार आहे. रो-रो कार सेवा एक दिवसाआड दोन्ही दिशांना म्हणजे, कोलाडहून वेर्णा आणि वेर्णा येथून कोलाडला धावेल. प्रवासाच्या तीन तास आधी म्हणजेच दुपारी दोन वाजता प्रवाशांना त्यांची गाडी कोलाड स्थानकात जमा करावी लागेल. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ही ट्रेन कोलाड स्टेशनवरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता वेर्णा स्टेशनला पोहोचेल.
रो रो’चे नांदगाव स्थानक दुर्लक्षित – कोकण रेल्वे मार्गावर कोलाड, वेर्णा आणि सुरतकल या स्थानकांवर रो-रो सेवेसाठी विशेष प्लॅटफॉर्म आणि ट्रॅक बांधले आहेत. त्याच धर्तीवर नांदगाव (ता. कणकवली) स्थानकातही मालवाहू ट्रक चढ-उतार करण्यासाठी विशेष ट्रॅक उभारला आहे. मात्र, या ट्रॅकचा आजवर वापरच झालेला नाही. जर रो रो कार सेवेसाठी नांदगाव स्थानक उपलब्ध झाले असते, तर त्याचा चाकरमान्यांना मोठा फायदा होणार होता.