गौरी-गणपतीचा सण हा कोकणी माणसासाठी आणि मुंबईत राहणाऱ्या कोकणी चाकरमान्यांसाठी खूप महत्त्वाचा सण आहे. गणेशोत्सव सणासाठी मुंबईत राहणारा कोकणी चाकरमानी आपल्या गावाला येण्यासाठी दोन ते तीन महिन्यांपूर्वीच एसटी तसेच रेल्वे मध्ये जागा आरक्षित करत असतात. गणेशोत्सवासाठी लागणारे सजावटीचे सामान, प्रसादाची फळे, पूजेची फुले असे खूप सामान घेऊन कोकणी माणूस आपल्या गणरायाच्या भेटीसाठी गावाच्या वाटेने प्रवास सुरू करतात. दोन-तीन महिने अगोदर जागा आरक्षित करून देखील या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून आरामदायी प्रवासाचा अनुभव येत नाही.
गणेशोत्सव सणासाठी कोकण रेल्वेने सर्व स्थानकात थांबतील अशा गाड्या सोडले आहेत, त्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये घुसखोर प्रवाशांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे वैध मार्गाने जागा आरक्षित केलेल्या प्रवाशांना घुसखोर प्रवाशांचा खूप त्रास सहन करावा लागतो व खूप वाईट अनुभव येतो. अशा घुसखोर प्रवाशांवर आळा ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून कोणताही अटकाव होताना दिसत नाही. किंबहुना आरक्षित तिकिटे नसतील अशा प्रवाशांना रेल्वेस्थानकातच प्रवेश बंद करून या गर्दीवर नियंत्रण करणे आवश्यक आहे.
अशा घुसखोर प्रवाशांमुळे अन्य प्रवाशांचे साहित्य सुरक्षित राहत नसून ते स्वच्छतागृहापर्यंत देखील पोचू शकत नाही तसेच या गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंग चा पूर्णपणे विसर पडला आहे असे दिसून येत आहे. या सर्व प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तरी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सुरक्षिततेचा विचार करून यावर त्वरित योग्य ती कार्यवाही सुरू करावी हीच विनंती नागरिक करत आहेत.

