28.5 C
Ratnagiri
Wednesday, August 6, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...

कुंभार्ली घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक

वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या कुंभार्ली घाट रस्त्यांची...
HomeRatnagiriकोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त घालत असताना गांजा सदृश अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६९५.५ ग्रॅम वजनाचा गांजा व दुचाकीसह ९६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यजीत सदाशिव जाधव (वय ३३, रा. नाचणकर चाळ, एमआयडीसी रत्नागिरी. मूळ विकासनगर, स्टेशन रोड, इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ३) रात्री नऊच्या सुमारास कोकणनगर ते प्रशांतनगर येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या सूचनेनुसार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांचे एक पथक कोकणनगर ते प्रशांतनगर येथे गस्त घालत होते.

त्यावेळी दुचाकीवर बसून संशयित आक्षेपार्ह हालचाली करत असताना आढळला. पोलिस पथकाला या तरुणाचा संशय आला. त्यांनी त्याच्या ताब्यातील साहित्याची खात्री करण्यासाठी दोन पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील दुचाकीत प्लास्टिक पिशवीमध्ये काळपट, हिरवट रंगाची पाने फुले, काड्या व बोंडे असलेल्या वनस्पतीचे शेंडे असलेला उग्र वासाचा गांजा सदृश अमली पदार्थ सापडला. पोलिसांनी त्याच्याकडून ६९५.५ ग्रॅम वजनाचा ३१ हजारांचा गांजा व त्याच्या ताब्यामध्ये असलेली ६५ हजाराची दुचाकी असा ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, साहाय्यक पोलिस फौजदार दीपक साळवी, हवालदार पंकज पडेलकर, आशिष भालेकर, प्रशांत पाटील, अमोल भोसले, अमित पालवे यांनी केली.

पुढे येऊन तक्रार द्या… – जिल्ह्यात अमली पदार्थावर पोलिसांची कारवाई सुरू आहे. यासंदर्भात परिसरात कोणत्याही संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना द्या. तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular