मागील वर्षापासून कोरोनामुळे रत्नागिरी ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या बंदच करण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातून दररोज ये-जा करणारे अनेक जण असतात, परंतु, एसटी वाहतूक बंद असल्याने शहरात यायचे म्हटले तरी, आर्थिक फटका सामान्य जनतेला सहन करावा लागतो. त्यामुळे, येत्या दोन दिवसांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेमध्ये करण्यात आली आहे.
सभापती सौ. संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली, त्यावर तोडगे काढण्यात आले, त्यामध्ये ग्रामीण भागातील कोरोनामुळे लॉकडाउन काळात एसटी बसच्या गावातील अजूनही बंद केलेल्या बसफेऱ्या अनेक भागात सुरू करण्यासाठी एसटी महामंडळाकडून कार्यवाही करण्यात आली नसल्याचे ज्येष्ठ सदस्य गजानन पाटील यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले.
ग्रामीण भागात अनेक बसफेऱ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. अलिकडे कोरोनाचा प्रभाव कमी होताच निवडक बसफेऱ्या अनेक मार्गावर सुरू करण्यात आलेल्या आहेत. गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांच्या मदतीला एसटी महामंडळ जादा बसच्या फेऱ्या सुरू करण्यासाठी पुढे सरसावले. मात्र येथील ग्रामीण भागातील जनतेच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार या महामंडळाकडून अद्याप केलेला नाही.
पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांनी सांगितले कि, आरे-वारे किंवा तालुक्यातील अन्य भागातही बंद बसफेऱ्यामुळे लोकांची खूपच अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे, जर चाकरमान्यांसाठी महामंडळ जादा बसची व्यवस्था करत असेल तर, ग्रामीण भागात सुद्धा येत्या दोन दिवसांत बंद असलेल्या एसटीच्या बसफेऱ्या सुरू केल्या जाव्यात, अशी सभेत उपस्थित सदस्यांनी पाठींबा देत मागणी केली आहे.