जिल्ह्यात शनिवार, दि. १६ ऑगस्ट रोजी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. जिल्ह्यात एकूण २,७५० दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात २७० सार्वजनिक आणि तब्बल २,४८० होता. खाजगी दहीहंड्यांचा समावेश सार्वजनिक दहीहंड्यांपेक्षा खाजगी दहीहंड्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील गोविंदा पथकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सार्वजनिक दहीहंड्यांचे सर्वाधिक आयोजन लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत (८२) झाले होते, त्यानंतर राजापूर (४०), दापोली (३८), खेड (२४), आणि चिपळूण (१७) यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे, खाजगी दहीहंड्यांच्या बाबतीत बाणकोट (३८९), चिपळूण (३२०) आणि दापोली (३२७) यांनी आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे, नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकही सांर्वजनिक दहीहंडी नसतानाही तेथे ३० खाजगी दहीहंड्यांचा उत्सव पार पडला.
रत्नागिरी शहरातही दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. पालकमंत्री ना. उदय सामंत मित्रमंडळाने मांडवी समुद्रकिनारी हंडी उभारली होती, जिथे नागरिकांनी मोठी गर्दी केली. मारुती मंदिरा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, आणि युवा अधिकारी प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली हंडीचे आयोजन करण्यात आले होते. खंडाळा येथे बाबू पाटील मित्रमंडळाच्या हंडीत गोपाळांनी जल्लोष केला. यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी या हंडीला भेट देऊन गोविंदांना शुभेच्छा दिल्या.