गणेशोत्सवानंतर चाकरमानी हळूहळू आपल्या दैनंदिन जीवनाकडे वळू लागले आहेत. सर्वजण वापसीच्या प्रवासाला लागले असून, एसटी महामंडळ, खाजगी बसेस, रेल्वे यांच्या मार्फत ठराविक ठिकाणी पोहोचत आहेत. प्रवासात येणारे अनेक अनुभव, घटना या कायम लक्षात राहणाऱ्या असतात. त्यामध्ये काही चांगले तर काही वाईट सुद्धा असतात.
सिंधुदुर्ग बांद्याहून मुंबईला जाणार्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा बस चालक प्रवाशांना आणि बसला चिपळूण वालोपे येथे वाटेमध्येच सोडून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई-गोवा महामार्गावर घडून आला आहे.
सारे प्रवासी गाढ झोपेत असताना मुंबईला येणाऱ्या एका ट्रॅव्हल्स बसच्या चालकाने प्रवाशांना आणि बसला जंगल सदृश्यभागात वाटेमध्येच सोडून गायब होण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे अशा प्रकारच्या प्रवासी वाहतुकीमुळे एक प्रकारे खळबळ माजली आहे. सदरचा प्रकार रात्री ३ वाजता एका प्रवाशाला जाग आल्याने समोर आला. ३ वाजता निर्जन स्थळी गाडी का थांबलीय हे पाहण्यासाठी तो प्रवासी सीटवरून उठून पुढे जाऊन पाहिले असता, तिथे ड्रायव्हर दिसला नाही. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर सुद्धा तो न आल्याने त्या प्रवाशाने इतर प्रवाशांना उठविण्यास सुरुवात केली आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
बस पूर्णत: जंगल सदृश्य भागामध्ये थांबवलेली असून, चिपळूणमधील वालोपे गावाच्या हद्दीत जंगल भागात थांबली असल्याने प्रवाशांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला आणि सर्व परिस्थिती कथन केली. चिपळूण पोलिसांचे एक पथक प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पहाटे सव्वा चारच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बसचा मालक, चालक, त्यांचा बुकिंग एजंटशी संपर्कच साधण्याचा प्रयत्न केला गेला.