मागील काही दिवसांपासून वैभव खेडेकर हे पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच गेले दोन दिवस वैभव खेडेकर भाजपाच्या वाटेवर असून लवकरच ते मनसेला सोडचिठ्ठी देतील, अशी चर्चा देखील सुरू होती. त्याची कुणकूण लागताच राज ठाकरेंनी मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
पक्षविरोधी कार्याचा ठपका – मनसेने याबाबत एक पत्रक प्रसिध्दीला दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे राज ठाकरे यांच्या आदेशाने खेडचे वैभव खेडेकर, राजापूरचे अविनाश सौंदळकर, चिपळूणचे संतोष नलावडे, माणगाव (रायगड) चे सुबोध जाधव यांना पक्षातून बडतर्फ करण्यात येत आहे. या पत्रकावर मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांची सही आहे.
कोण आहेत वैभव खेडेकर ? – वैभव खेडेकर हे राज ठाकरेंचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात कार्यरत होते. २०१४ साली त्यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. खेड नगरपरिषदेत मनसेची सत्ता आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. यापूर्वी ते खेडचे नगराध्यक्ष होते. वैभव खेडेकर आणि रामदास कदम यांच्यातील संघर्ष बराच काळ सुरू होता. परंतु हा संघर्ष कमी करत रामदास कदमांनी खेडेकर यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. खेड आणि दापोली परिसरात वैभव खेडेकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. खेडेकर यांच्यावर सध्या मनसेच्या राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटकपदाची जबाबदारी होती. परंतु गणेशोत्सवानंतर वैभव खेडेकर भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
२० वर्षांपासूनचे शिलेदार – वैभव खेडेकर हे राज ठाकरे आणण्यात वैभव यांचे कोकणातील महत्त्वाचे आणि गेल्या २० वर्षांपासूनचे शिलेदार होते. राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर आहेत. इतकंच नाही तर खेड नगरपरिषदेवर मनसेची सत्ता खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते खेडचे नगराध्यक्ष होते. या भागात शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांच्याशी वैभव खेडेकर त्यांनी बराच काळ संघर्ष केला होता. पण अलीकडे उभय नेत्यांमधील संघर्ष कमी झाला होता. काही दिवसांपूर्वी दापोलीत झालेल्या कार्यक्रमात रामदास कदम यांनी आमच्यातील सर्व मतभेद भैरीच्या पायाखाली गाडत आहोत, असे सांगत या संघर्षाला मुठमाती दिली होती. खेड आणि दापोली परिसरात वैभव खेडेकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. वैभव खेडेकर हे त्यांच्या आक्रमक नेतृत्वशैलीसाठी ओळखले जातात. वैभव खेडेकर यांच्यावर आता सध्यस्थितीत मनसेच्या राज्य सरचिटणीस, कोकण संघटकपदाची मोठी जबाबदारी होती.
शिवसेनेचीही ऑफर ? – वैभव खेडेकर हे मनसेमध्ये नाराज असल्याची चर्चा गेले अनेक दिवस खेडच्या राजकारणात सुरू होती, मध्यंतरी नाशिकमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे एक शिबीर बोलावण्यात आले होते. त्या शिबीराला वैभव खेडेकरांना बोलावण्यात आले नव्हते. तेव्हापासून ही चर्चा अधिक जोरात सुरू झाली होती. वैभव खेडेकर यांना शिंदेंच्या शिवसेनेने आपल्या पक्षात यावे, अशी ऑफर दिली होती. रामदासभाई कदम यांच्यासह पालकमंत्री ना. उदय सामंत हेदेखील त्यांच्या संपर्कात होते, अशी चर्चा सुरू होती.
भाजपामध्ये प्रवेश? – या सर्व पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस अचानक वैभव खेडेकर हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची त्यांनी अलिकडेच भेट घेतल्याचे बोलले जात होते. गणेशोत्सवानंतर प्रवेश होणार, अशा चर्चा सोशल मिडियावर रंगल्या होत्या. वैभव खेडेकर यांनी या चर्चेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र त्याचवेळी त्यांनी चर्चा नाकारलीही नव्हती. या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर त्यांच्या पक्षप्रवेशाची पोस्ट व्हायरल झाली. ‘डबल धमाका, दे धक्का, खेडमध्ये लाल दिवा पक्का’ अशा आशयाचा मेसेज फिरत होता. ४ सप्टेंबरला धमाका होणार, असेही सांगितले जात होते.
राज ठाकरेंनी केले बडतर्फ – वैभव खेडेकर भाजपात जाणार अशी चर्चा सुरू होतीच. त्याची कुणकूण मनसेप्रमुख राज ठाकरे यांना लागली होती. त्यामुळे त्यांनी तातडीने वैभव खेडेकरांसह रत्नागिरी जिल्ह्यातील अविनाश सौंदळकर (राजापूर) आणि संतोष नलावडे (चिपळूण) यांना बडतर्फ केले आहे. वैभव खेडेकर आता कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.