कडवई घोसाळकर कोंड येथील पाझर तलावाचे काम २००७ मध्ये बंद पडले. त्यानंतर तब्बल १८ वर्षे लोटली तरी अद्याप अर्धवट पडलेले ते काम पूर्ण करण्यात आले नसल्याने साऱ्या परिसरातील हजारो ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होत आहे. तरी ते काम शासनाने प्राधान्याने पूर्ण करावे अशी मागणी कडवई परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. कडवई घोसाळकर कोंड येथील पाझर तलावाचे काम मागील १८ वर्षांपासून अर्धवट स्थितीत असून अनेक वेळा अर्ज विनंत्या करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
१८ वर्षानंतरही अर्धवट ! – कडवई घोसाळकर कोंड येथील पाझर तलावाचे काम दि. ८ डिसें. २००७ रोजी सुरु झाले. परंतु काम सुरु होऊन महिनाभरातच ते बंद पडले. त्यानंतर थोडी थोडकी नव्हेत तर तब्बल १८ वर्षे लोटली तरी ते अर्धवट स्थितीत असलेले पाझर तलावाचे काम पूर्ण झालेले नाही. कडवई येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा ते काम पूर्ण होण्यासाठी शासन दरबारी अर्ज विनंत्या केल्या, मंत्रालयात खेटे मारले, अनेक पुढाऱ्यांचे उंबरठे झिजवले परंतु ते काम अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही त्यामुळे साऱ्या परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पाण्यासाठी वणवण ! – कडवई घोसाळकर कोंड येथील पाझर तलावाचा लाभ घोसाळकर वाडी, सुतार वाडी, तांबड वाडी, दळवी वाडी, पुरोहित वाडी व बाजारपेठ या परिसरातील हजारो ग्रामस्थांना होणार असल्याने ग्राम स्थांच्या मागणीनुसार पाझर तलावाचे काम ७ डिसें. २०१७ रोजी सुरु करण्यात आले. परंतु महिनाभरात ते बंद पडले, ते पुन्हा सुरु झाले नाही व पाझर तलाव पूर्ण झाला नाही. पावसाळ्यात पाझर तलाव तुडुंब भरतो परंतु काम अपूरे असल्याने पाणी साठा होत नाही व उन्हाळ्यात हजारो ग्राम स्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.
पावसाळ्यानंतर कोरडा ! – या पाझर तलावात पावसाळ्यात जमा झालेले जादा पाणी विसर्ग होण्यासाठी जो कालवा खोदण्यात आला आहे त्याची खोली अधिक असल्याने पाणी निघून जाते व पावसाळा संपताच पाझर तलावात ठणठणाट होतो. तसेच पाझर तलावाला संरक्षक बंधारा नसल्याने आजूबाजूच्या शेत जमीनीची धूप होते शिवाय पाणी जिरुन तलावातले पाणी पावसाळ्यानंतर लगेच संपून जाते.
ग्रामस्थांची मागणी – तरी पाझर तलावाला संरक्षक बंधारा बांधण्यात यावा व जादा पाणी विसर्ग होण्यासाठी खोदण्यात आलेल्या कालव्याची उंची कमी करण्यात यावी म्हणजे तलावात बारा महिने पाणी साठा होईल व त्याचा लाभ जवळपासच्या ग्राम स्थांना तसेच शेतीला होईल, तरी हे काम प्राधान्याने पूर्ण करावे अशी मागणी कडवईतील नागरिकांनी केली आहे.

