गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या नगर पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रारूप प्रभाग रचना निश्चित केली आहे. प्रारूप प्रभाग रचनेमध्ये पूर्वीच्या आठ प्रभागांचे नव्या दहा प्रभागांमध्ये विभाजन झाले आहे. त्यातून, नगरसेवकांची संख्याही वाढताना १७ वरून वीस झाली आहे. जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर निर्धारित कालावधीमध्ये तब्बल ८३ हरकती दाखल झाल्या आहेत. त्यामधील सर्वाधिक ७३ हरकती प्रभाग १० मधील प्रभाग रचनेबाबत दाखल झालेल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. नागरिकांकडून दाखल झालेल्या हरकतींवर येत्या सोमवारी (ता. ८) प्रशासकीय स्तरावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये दाखल झालेल्या हरकतींबाबत नेमका कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे आता लक्ष लागून आहे. ऐन दिवाळीमध्ये किंवा त्यानंतर नगरपालिका निवडणुकीचे फटाके फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रशासनाकडून प्रभाग रचना जाहीर केली असून, त्यावर निर्धारित कालावधीमध्ये हरकतीही दाखल झाल्या आहेत.
प्रभाग १० मधील प्रभाग रचनेबाबत सर्वाधिक हरकती दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये दिवटेवाडी येथील ग्रामस्थांनी हरकत दाखल केली आहे. दिवटेवाडीचे प्रभाग क्र. ८, ९ व १० अशा तीन प्रभागांत विभाजन करण्यात आले आहेत. दिवटेवाडी ही भौगोलिकदृष्ट्या तसेच लोकसंख्येनुसार मोठी वाडी असली तरी या वाडीचे विभाजन हे किमान प्रभागात होणे आवश्यक आहे. असे असताना या वाडीचे विभाजन हे कमाल प्रभागात करण्यात आले आहे. दिवटेवाडी व प्रभाग क्र. १० यामध्ये अर्जुना नदी असून, या वाडीपासून प्रभाग क्र. १० मधील मतदान केंद्र अडीच ते तीन किलोमीटर लांब आहे. या साऱ्या बाबीकडे प्रशासनाचे या हरकतीद्वारे लक्ष वेधताना प्रारूप प्रभाग रचनेनुसार प्रभाग १० मध्ये समावेश करण्यात आलेला दिवटेवाडीचा भाग प्रभाग ९ मध्ये समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी हरकतीद्वारे करण्यात आली आहे. दिवटेवाडी येथील नागरिकांनी घेतलेल्या हरकतींबाबत प्रशासन आता कोणता निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.