रत्नागिरी व नागपूर महाविद्यालय स्वतंत्र कायद्याने अस्तित्वात आलेली आहेत. साधारणतः आठ वर्षांपूर्वी नागपूरमधील पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाकडे पुरेसा निधी व कर्मचारी नसल्यामुळे महाराष्ट्र विधीमंडळात या प्रश्नावर चर्चा झाली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे २६ मे २००८ मध्ये डॉ. मुगणेकर समिती नेमण्यात आली आणि समिती निर्णय देईल, त्याठिकाणी वर्षभरात कोकणात मत्स्यविज्ञान विद्यापीठ गठीत करण्यात येईल, असे निःसंदिग्ध आश्वासन देण्यात आले, परंतु त्या मुणगेकर समितीचा अहवाल गेली १२ वर्षे धूळ खात पडला आहे, अशी माहिती कोकणचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी दिली. मत्स्य विद्यापीठ कोकणात का हवे आहे, याबाबत अॅड. पाटणे म्हणाले, ‘कोकणातील नद्या, खाड्या, समुद्र व ७० खाड्यांच्या भोवती असलेले १४ हजार ४४५ हे खाजणक्षेत्र मत्स्यशेतीला उपलब्ध आहे, परंतु त्यातील केवळ ५ टक्के क्षेत्र निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेतीकरिता वापरले जाते. याउलट गुजरातमध्ये ५० टक्के वापरले जाते. कोकणातील विद्यार्थ्यांना फिशरीज इंजिनिअरिंगचे पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
अॅक्वाकल्चर संबंधीचे प्राथमिकस्तरावरील तांत्रिक शिक्षण केंद्र सरकारच्या समुद्र उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणामार्फत पनवेल येथे दिले जाते, तर अतिशय उच्च दर्जाचे तंत्रशिक्षण केंद्रीय मत्स्य विज्ञान शिक्षण संस्था मुंबई येथे दिले जाते. वस्तुतः फिशरीज इंजिनिअरिंगचे सर्व प्रकारचे पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण कोकणात उपलब्ध झाले पाहिजे. मत्स्यविद्यापीठअंतर्गत मालवण, दापोली व अलीबाग येथे मत्स्यविद्यालय सुरू केली पाहिजेत. विशेष करून मत्स्य उपलब्धी व्यवस्थापन, मत्स्य पर्यावरण, मत्स्य काढणी पश्चात तंत्रज्ञान इत्यादी अभ्यासक्रमाचा अंतर्भाव झाला पाहिजे. महाराष्ट्रात गोड्या पाण्याच्या क्षेत्रात १.५७ लक्ष टन, तर कोकण किनारपट्टीवर ४ लाख ३२ हजार ७४८ टन मत्सोत्पादन होते हे आपण प्रकर्षान लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्रातून जवळजवळ १ लाख ८६ हजार २४७टन मासे निर्यात होऊन ५ हजार ८७८ कोटी रुपयांचे परकीय चलन उपलब्ध होते, असे तज्ज्ञ डॉ. केतन चौधरी यांचे मत आहे.
रोजगाराच्या संधी वाढतील – केरळ व तमिळनाडूमध्ये १० ते ११ वर्षांपासून स्वतंत्ररीत्या मत्स्यविद्यापीठ सुरू झाली आहेत. आम्ही मात्र चर्चा, घोषणा, समिती व अहवाल यात पुरते अडकलो आहोत. मुंबई, पनवेल, मूळधे, रत्नागिरी, नागपूर आणि उदगीर येथील मत्स्यविज्ञान महाविद्यालये व संशोधन केंद्रे एकत्र करून कोकणात स्वतंत्र मत्स्य व समुद्र विज्ञान विद्यापीठ झाल्यास नवीन अभ्यासक्रम, संशोधन होऊन पूर्ण क्षमतेने मत्स्यव्यवसाय वाढीला लागून रोजगाराच्या संधी वाढतील आणि मत्स्य विज्ञानाची एक शैक्षणिक संस्कृती कोकणात उदयाला येईल, असे पाटणे यांनी सांगितले.

