कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ‘केआर मिरर’ हे नवे मोबाईल अॅप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवासादरम्यान लागणारी सर्व माहिती अगदी एका क्लिकवर मिळणार आहे. या अॅपची रचना वापरण्यास सोपी, सर्वांसाठी सहज उपलब्ध आणि वैयक्तिक गरजांनुसार उपयुक्त ठरेल यावर भर देण्यात आला आहे. हे अॅप मराठीसह चार भाषांमध्ये कार्यरत आहे. प्रवाशांना सद्यःस्थितीत रेल्वेगाड्यांची माहिती व तपशीलवार वेळापत्रक पाहता येणार आहे. स्थानकांसह रेल्वेतील केटरिंग सेवा, महिला प्रवाशांसाठी खास सुविधा आणि विविध हेल्पलाइन क्रमांक यांची माहिती उपलब्ध आहे.
अॅपमध्ये कोकण रेल्वेचा इतिहास, मैलाचे दगड आणि विविध प्रकल्पांची माहिती दिली आहे. कोकणातील प्रसिद्धस्थळांची माहिती अॅपमध्ये उपलब्ध असल्याने प्रवासाचे नियोजन करणे आणखी सोयीचे होणार आहे. अॅपला थेट कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाशी जोडलेले असल्याने अधिकृत माहिती सहज मिळू शकेल. केंद्रीय सूचना प्रणालीद्वारे होणाऱ्या उद्घोषणा व सूचना आता अॅपमध्ये पाहता येणार आहेत. या अॅपच्या माध्यमातून प्रवासादरम्यान सुरक्षा जागरूकता मोहीम अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहे. विशेषतः उत्सवकाळात कोकणात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
उत्सवकाळात विशेष गाड्या – काळात जादा गाड्या चालवल्यानंतर आता दसरा, दिवाळी आणि डिसेंबरमध्येही मोठी प्रवासी गर्दी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी अशी विशेष साप्ताहिक रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. या काळात एकूण आठ फेऱ्या चालवल्या जातील.