हवामान खात्याने अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचे वादळ निर्माण होत असल्याचा इशारा दिल्यानंतर तातडीने खबरदारीसाठी म्हणून हर्णे बंदरातील सर्व नौकांनी जयगड, दिघी, आंजर्ले खाडी, हर्णै बंदरात आश्रय घेतला आहे. १ ऑगस्टपासून शासनाच्या नियमानुसार, मासेमारी हंगामास सुरुवात झाली होती. प्रारंभीचा हंगाम चांगला गेल्याने २००हून अधिक नौकांनी मुहूर्ताच्या दिवशी मासेमारीसाठी समुद्र गाठला होता. त्यानंतर गणेशोत्सवामुळे १५ दिवस मासेमारी बंद राहिली. सप्टेंबरच्या शेवटी वादळी वातावरणाने पुन्हा डोके वर काढले. २७ सप्टेंबरपासून ते २ ऑक्टोबरपर्यंत वातावरण खराब होते, तर ३ ऑक्टोबरपासून काही नौका समुद्रात उतरल्या होत्या.
वादळाचा इशारा मिळताच सर्व नौका तातडीने परत फिरल्या. जयगड खाडीत १५० ते २००, दिघी खाडीत ५० ते ६०, हर्णे बंदरात २० ते ३० तर उर्वरित नौका आंजर्ले खाडीत आश्रयास आल्या आहेत. सध्या बंदर परिसरात वातावरण शांत असले तरी समुद्रात पाण्याला जोरदार हिसका असून, वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे मासेमारी करणे धोकादायक ठरते आहे. त्यामुळे जाळ्यांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन मच्छीमार बांधवांनी मासेमारी तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. वादळामुळे मच्छीमारांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागणार असून, वातावरण शांत झाल्याशिवाय मासेमारी पुन्हा सुरू होणे अशक्य असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.