रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव, तसेच खडखड करणारा त्रासदायक प्रवास यांपासून दापोलीकरांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. दापोली आगारात ३५ नवीन इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस दाखल होणार आहेत. ऐन उन्हाळ्यात या बसेस येणार असल्याने दापोलीकरांचा प्रवास सुखकारक होणार आहे. राज्य सरकारने ओलेक्ट्रॉ कंपनीच्या ५ हजार इलेक्ट्रिक बसेस खासगी कंपनीमार्फत चालवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार टप्प्याटप्प्याने या बसेस राज्यातील विविध आगारांमध्ये दाखल होत आहेत. प्रवाशांकडून या बससेवेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. याच धर्तीवर दापोली, खेड, चिपळूण व रत्नागिरी या चारही आगारांना प्रत्येकी ३५ बसेस देण्याचे नियोजन केले आहे. दापोली आगारात चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. स्टेशनची रचना पूर्ण झाली असून, ‘महावितरण’कडून वीजपुरवठा जोडणी बाकी आहे.
स्टेशनसमोरील काँक्रिटीकरणाचे कामही वेगाने सुरू आहे. दापोली आगारातून पनवेल, बोरिवली, स्वारगेट व रत्नागिरी या मार्गांवर नवीन इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. प्रत्येक तासाने बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चालकांची भरती ओलेक्ट्रॉ कंपनीकडून करण्यात येत असून, नुकत्याच झालेल्या भरतीत ३५ स्थानिक चालकांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. त्यांना १ नोव्हेंबरपासून नियुक्तिपत्रे दिली जाणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावण्यास सुरू झाल्यानंतर दापोली आगारातील बसफेऱ्यांचा गोंधळ कमी होणार आहे. तसेच प्रवाशांना आरामदायी, नियमित आणि दर्जेदार प्रवासाचा अनुभव घेता येईल. या बससेवेचे तिकीट ‘शिवशाही’पेक्षा अधिक असेल. त्यामुळे खिशाला थोडी झळ बसणार आहे.