पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवशीय अमेरिका दौऱ्यावर गेले असून, त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वेळेप्रमाणे मध्यरात्री अमेरिकेच्या वॉशिंग्टन डलस आंतरराष्टीय विमानतळावर उतरले. दरम्यान, विमानतळावर मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले.
भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू आणि अमेरिकन अधिकारी यांनी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर जंगी स्वागत केले. संधू यांनी नमस्ते यूएसए म्हणत मोदींचे स्वागत केले. भारतीय समुदायाचे अनेक जण पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तीन दिवशीय आयोजित कार्यक्रमांसाठी पंतप्रधान मोदी आता थेट पेंसिलवेनिया एवेन्यू येथील हॉटेल विलार्ड इंटर कॉन्टिनेंटलसाठी रवाना होणार असून अमेरिका दौऱ्या दरम्यान मोदी याच हॉटेलमध्ये राहणार आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, सोबतच ते क्वाड लीडर्स मीट आणि यूएनजीए सोबत पहिली बैठक करणार आहेत. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदीं सोबत परराष्ट्र मंत्री, एनएसए सह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा समावेश असून हा दौरा नेमका कसा असेल याची माहिती दिली आहे.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची आज पंतप्रधान मोदी भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये भारत आणि अमेरिकेच्या समान हितसंबंधांवर चर्चा केली जाणार आहे. विशेष म्हणजे कमला हॅरिस या भारतीय वशांच्या आहेत. मोदी आज हॅरिस यांच्या व्यतिरिक्त क्वालकॉम, अॅडोब, अॅपलचे सीईओ टीम कुक आणि ब्लॅकस्टोन सारख्या कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतील. मोदींनी यावेळी भारतीय लोकांच्या शुभेच्छांना चांगलाच प्रतिसाद दिला.