रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १० मध्ये २ नगरसेवक निवडण्यासाठी शनिवारी २० डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळात मतदान होणार असून निवडणूक आयोगाने या मतदानाची सारी तयारी पूर्ण केली आहे. अपक्ष उमेदवाराने अर्ज छाननीच्यावेळी घेतलेल्या आक्षेपानंतर राज्य निवडणूक आयोगाने २ डिसें. ला या प्रभागात होऊ घातलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित केली होती. विशेष म्हणजे केवळ नगरसेवक पदाच्या निवडणुकीला स्थगिती होती. प्रभाग क्र. १० मधील मतदारांनी २ डिसें. ला थेट नगराध्यक्ष निवडण्यासाठी मतदान केले. आता त्यांना शनिवारी २० डिसें. ला २ नगरसेवक निवडण्यासाठी मतदान करावयाचे आहे.
एकूण ६ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य मुकाबला भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार माजी नगरसेवक राजेश तोडणकर आणि म ाजी नगरसेविका सौ. मानसी करमरकर यांचा मुकाबला उबाठाचे राजाराम रहाटे आणि उन्नती कोरगांवकर यांच्यात होणार आहे. प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या. शनिवारी मतदान होणार असून रविवारी २१ डिसें.ला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

