दापोली तालुक्यातील पन्हळेकाजी येथे कोकणातील सर्वात प्राचीन शिलालेख आढळला असून प्रसिध्द पन्हाळेकाजी लेणीसमूहाच्या विरूद्ध बाजूला होळवाडी गावाच्या बाजूने कोटजाई नदीच्या किनारी नदीला लागून एका खडकावर हा शिलालेख कोरलेला आहे. हा शिलालेख सन १०५२ मधील असून तो कोकणातील सर्वात प्राचीन शिलालेख असल्याची माहिती पुणे येथील इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांनी दिली आहे. दापोली तालुक्यातील प्रसिद्ध पन्हाळेकाजी लेणीसमूहाच्या विरूध्द बाजूला होळवाडी गावाच्या बाजूने कोटजाई नदीच्या किनारी नदीला लागून एका खडकावर कोरलेला हा शिलालेख कोरीव स्वरूपाचा असून आठ ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे.
शिलालेखाची उंची १९ इंच असून रूंदी १८ इंच आहे. शिलालेखाची अक्षरे अतिशय जुन्या वळणाची असून सुंदर एकसारखी कोरलेली आहेत. जागेअभावी शिलालेख अक्षरे खाली तसेच वर व उजवीकडे आणि डावीकडे कोरलेली आहेत. अक्षरांची उंची एक इंच असून त्यांचा कोरीवपणा व खोदीवपणा उत्तम असून शिलालेख सहज वाचता येतो. नदीच्या प्रवाहात सतत पाणी असल्याने खडकाचा काही भाग झिजला असून लेखाच्या वरील भागात सूर्यचंद्र असून मध्यभागी मंगल कलश कोरला आहे.
शिलालेखाचे महत्व – दापोलीतील पन्हाळेकाजी गाव हे प्राचीन आणि सुंदर लेणीसमूहांसाठी ते प्रसिध्द आहे. जेथे शैव, बौध्द व नाथपंथी संस्कृतीचे दर्शन घडते आणि या ठिकाणाला समृद्ध ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा लाभला आहे. लेखात कपिलेश्वराचे मंदिर बांधले असा स्पष्ट उल्लेख आहे. आज मात्र मंदिराचे किरकोळ अवशेष वगळता बाकीचे पूर्ण अवशेष गहाळ आहेत. शेजारी एक वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग असून त्यावरती पाच मुखं लिंग कोरलेली आहेत. सध्या ते नदीपात्राशेजारी स्थापित केले आहे. पूर्वी हे शिवलिंग नदीपात्रात सापडले, असे ग्रामस्थ सांगतात.
हजारो वर्षांपूर्वीचा उल्लेख – सुमारे १०५० वर्षापूर्वी मंदिर बांधल्याची अधिकृत नोंद असलेला हा शिलालेख ऐतिहासिक, सांस्कृतिक व पुराततात्विकदृष्ट्या अत्यंत मौल्यवान आहे. स्थानिक इतिहासाची कालमर्यादा, समाजव्यवस्था आणि दात्यांचे योगदान याचे प्रामाणिक दालन म्हणून याकडे पाहिले पाहिजे. याचबरोबर मराठी भाषेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा शिलालेख असून कोकणातील आद्य शिलालेखाच्या रांगेत याचा समावेश होऊ शकतो हे या शिलालेखाचे महत्व आहे. या शिलालेखाचे वाचन अनिल दुधाणे, अथर्व पिंगळे यांनी केले असून लेखाचे संशोधन प्रवीण कदम (कोकण इतिहास परिषद) व शशिकांत शेलार यांनी केले आहे.

