राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असली तरी दिवाळीनंतरच महाविद्यालये सुरू होतील, अशी स्थिती आहे. परंतू, यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोविड टास्क फोर्ससोबतच्या अंतिम चर्चेनंतरच निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यातल्या शाळा सुरू होणार आहेत. मात्र प्रत्यक्षात महाविद्यालये कधी सुरू होणार याबद्दल राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनाचा आटोक्यात आलेला प्रादुर्भाव पुन्हा वेग घेऊ नये, यासाठी योग्य ती पुरेपूर काळजी घेऊनच महाविद्यालये सुरू करण्याचा आमचा विचार आहे.
१ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत असले तरी, मात्र मागील वेळी असा गैरसमज झालेला की, तेव्हा पासूनच महाविद्यालयं सुरू होणार आहेत. यूजीसी आणि एआयसीटीईच्या म्हणण्यानुसार, १ नोव्हेंबरपासून महाविद्यालयं सुरू करण्यात यावी. मात्र त्या काळात आपल्याकडे दिवाळीचा सण असल्याने त्या काळामध्ये महाविद्यालये सुरू करता येण शक्य होणार नाही.
राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात नाम. सामंत म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना संक्रमितांच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच मग त्यावर निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये अजूनही कोरोनाची भीती आहे. त्यामुळे उपस्थितीबाबत विद्यार्थ्यांना सक्ती केली जाणार नाही. शिवाय, त्याबाबत कोणत्याही हमीपत्राची आवश्यकता नाही.
या सर्व बाबींचा सखोल विचार करूनच मग निर्णय घेण्यात येईल. राज्यात कोरोनाची स्थिती कमी झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अगदी नगण्य असून ती शून्यावर आली आहे. त्यामुळे जिथे कोरोनाची बाधित रुग्णसंख्या अगदी कमी आहे, त्या भागातील महाविद्यालये सुरू करण्यास हरकत नसावी. मात्र, सर्वस्वी मुख्यमंत्रीच याबद्दलचा निर्णय घेतील, असेही श्री सामंत यांनी स्पष्ट केले.