पुणे मेट्रोसाठी बनविण्यात आलेल्या ट्रेन या जागतिक दर्जाच्या, अत्याधुनिक, वजनाने हलक्या व ऊर्जेची बचत करणाऱ्या असणार आहेत, असे याप्रांसगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले आहे. पुणे मेट्रोसाठी ३४ मेट्रो ट्रेनची ऑर्डर टिटागढ फिरेमा या कंपनीला देण्यात आली असून, प्रत्येक ट्रेन मध्ये ३ कोचची सुविधा असणार आहे. पुणे मेट्रोसाठी टिटागढ फिरेमा ही कंपनी १०२ कोच बनवून देणार आहे. त्यातील पहिल्या काही ट्रेन या टिटागढ फिरेमाच्या इटली येथील कारखान्यामध्ये तयार होत असून, उर्वरित ट्रेन कोलकत्ता येथे तयार होणार आहेत.
इटली येथे तयार होणाऱ्या ट्रेनपैकी तीन कोचची पहिली ट्रेन काल मुंबई बंदरात दाखल झाली असून, समुद्रमार्गे आलेली ट्रेन क्रेनच्या सहाय्याने जहाजावरुन उतरवून ट्रकवर लादण्यात आली आहे. समुद्रमार्गे आल्याने कस्टम आणि इतर बाबी पुर्ण झाल्यानंतर ट्रेन लवकरच पुण्याच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत.
एका कोचची प्रवासी आसनक्षमता ३२० इतकी असणार असून संपूर्ण ३ कोच ट्रेनमधून ९७० प्रवासी प्रवास करु शकणार आहेत. तीन कोचच्या ट्रेन मध्ये एक डब्बा विशेष महिलांसाठी राखीव ठेवला जाणार आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग लोकांसाठी २ व्हीलचेअर व्यवस्थित राहतील एवढी जागा राखीव असणार आहे. प्रत्येक कोचमध्ये ४४ लोकांना बसण्याची व्यवस्था असेल. कोचचा वेग हा जास्तीत जास्त ९० किमी प्रति तास राहणार आहे.
पुणे मेट्रोसाठी बनवण्यात येणाऱ्या कोच या अल्युमिनियम धातूपासून बनविण्यात आलेल्या आहेत. एका कोचची लांबी २९ मीटर तर कोचची उंची ११.३० मीटर असणार आहे. कोचची अधिकतर रुंदी २.९ मीटर एवढी असणार आहे. या ट्रेनमध्ये जागतिक दर्जाच्या अद्ययावत प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. ज्यामध्ये आपत्कालीन दरवाजा, प्रवासी उद्घोषणा प्रणाली, एअर कंडिशनिंग, सीसीटीव्ही, प्रवांशाच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटण, दरवाजे उघडताना व बंद होताना दृश्य आणि श्राव्य संकेत प्रणालीची सुविधा असणार आहे.