काजरघाटी महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवास सुरुवात.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्व मंदिरे भक्तांसाठी खुली करण्यात आली आहेत. नवरात्र असल्याने सर्व देवींच्या मंदिरामध्ये एकदम चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक हिंदू धर्मातील व्यक्तीचा विशेषतः महिलांचा नवरात्री मध्ये नऊ देवीच्या मंदिरात जाऊन खणा नारळाने ओटी भरण्याचा मानस असतो. त्यासाठी रत्नागिरी तील काही प्रसिद्ध मंदिरे आपण पाहणार आहोत.
रत्नागिरी शहरापासून साधारण ७ किलोमीटर अंतरावर, पोमेंडी खुर्द काजरघाटी येथे काहीशा जंगलमय भागामध्ये महालक्ष्मी जाऊन वसली आहे. या देवीला काजरघाटीची महालक्ष्मी असे संबोधले जाते.
महालक्ष्मी मंदिर देखील गुरुवारपासून
नवरात्रोत्सवाला सुरवात झाली आहे. कोरोनाचे संकट अजून पूर्ण गेले नसल्याने, कोरोनाची निर्बंध लक्षात ठेवून आणि त्याचे काटेकोरपणे पालन करूनच हा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने, भाविकांनी विशेष सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थानमार्फत करण्यात आले आहे.
एकतर दीड वर्षांनी मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात आली असून, त्यामध्ये नवरात्रीचा उत्सव म्हणजे दुग्धशर्करा योग. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीला विविध रंगांची वस्त्र नेसवली जातात. साज शृंगार करून, सोन्या किंवा चांदीच्या धातूचे मुखवटे चढवले जातात. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली आह. त्यामुळे देवीच्या तेजाप्रमाणे मंदिर सुद्धा प्रकाशमान झाले आहे. मंदिराच्या आजू बाजूच्या परिसरामध्ये मोकळी जागा असल्याने चारचाकी वाहन सुद्धा थेट मंदिरापर्यंत जाते.
पूर्वी मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायवाटच होती फक्त. कुवारबाव, कारवांचीवाडी, गयाळवाडी परिसरातील महिला जंगलातून अगदी एक नदीपात्र पार करून देवीच्या दर्शनासाठी मंदिरापर्यंत जात असत. परंतु, कालांतराने पोमेंडी मार्गे काजरघाटीतुन एक चिऱ्याची पक्की पाखाडीच बांधून मंदिरापर्यंत सुरक्षित पोहोचता येते.
कोरोनामुळे यावर्षी दांडिया गरबाला बंदी असली तरी देवीच्या दर्शनाला परवानगी मिळाल्याने, भाविक विशेषतः महिला वर्ग आनंदात आहे. दरवर्षीप्रमाणे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार नसून शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून उत्सव साजरा होणार आहे. उत्सव काळात केवळ देवीची पूजा अर्चा होणार आहे. या व्यतिरिक्त इतर कोणतेही कार्यक्रम मंदिरामध्ये होणार नाही आहेत.
भाविकांना कोरोनाविषयक शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच दर्शन घेता येणार आहे. त्यामध्ये मंदिरात प्रवेश करताना मास्क घालणे बंधनकारक असून, एकावेळी केवळ पाचजणांना मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महालक्ष्मी देवस्थानने केले आहे. दर्शन सर्वांना मिळणार असून, फक्त कोरोनामुळे तेवढी खबरदारी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे.