गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले क्रूझवरील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर जोरदार टीका करून अनेक आरोप लावले आहेत. त्याचप्रमाणे समीर वानखेडे हे या प्रकरणाचा तपास हेतु पुरस्सर विशिष्ट पद्धतीने करत असल्याची टीका देखील नवाब मलिक यांनी केली होती.
नवाब मलिक यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे कि, एनसीबीनं आता मोठा निर्णय घेतला असून या क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा समीर वानखेडेंकडून तपास काढून घेण्यात आला आहे. त्यावर समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले असून ते म्हणाले कि, आर्यन खान केस प्रकरणाचा तपास माझ्याकडून काढून घेण्यात आला नाही, या प्रकरणासंबंधी मीच न्यायालयामध्ये एक रिट पीटिशन दाखल केली असून, संबंधित प्रकरणाचा तपास आता केंद्रीय संस्थेकडून करण्यात यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे आर्यन खान आणि समीर खान यांच्या प्रकरणाचा तपास आता दिल्लीतील केंद्रीय तपास यंत्रणेच्या एसआयटी कडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा तपास आता एनसीबीच्या दिल्लीतील टीमच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबईतील टीमच्या एकत्रितपणे कामाने तपास करण्यात येणार आहे.
दिल्ली एनसीबीची एक टीम उद्या मुंबईमध्ये दाखल होणार असून, आर्यन खान आणि नवाब मलिकांचे जावाई समीर खान यांच्यासह इतर चार केसेसचा तपास आता या टीममार्फत करण्यात येणार आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज या प्रकरणाचा त्यामध्ये समावेश आहे. मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार असून, या सहा प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीचे अधिकारी संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.