गावी जमीन असेल तर त्यावर अस केलं असत आणि तसं केल असत म्हणणारे फक्त फुकटच्या थापा मारणारे असतात. पण खरोखरच आपल्या ज्ञानाचा वापर करून कोणती गोष्ट आत्मसात केली तर त्याला नक्कीच नावलौकिक मिळते. असाच काही प्रयोग रत्नागिरी संगमेश्वर मधील एका व्यक्तीने केला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील पोचरी गावातील प्रयोगशील शेतकरी रोहित पटवर्धन यांनी गोआधारित शेतीचा अभिनव प्रयोग करून शेतीतून येणाऱ्या उत्पन्नामध्ये २५ टक्के नफा मिळवला आहे. तसेच शेती सोबतच दुधाचा जोडधंदा करत दोन देशी गाईवरून आता थेट २५ गाईंपर्यंत यशस्वी मजल मारली आहे.
पटवर्धन कुटुंबाचे मूळचे संगमेश्वर तालुक्यातील पोचरी गावाचे असले तरी हे सर्व कुटुंब रत्नागिरी शहरात दुग्धव्यवसाय, किराणा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री अशा विविध व्यवसायांत स्थिर आहेत. यातील रोहित पटवर्धन यांनी हि अनोखी वाट निवडली. त्यांनी २०१५ साली सखोल अभ्यास करून पोचरी या मूळ गावी गोआधारित शेती करण्याचा धाडसी निर्णय घेत दोन देशी गाई घेतल्या. गीर प्रजातीच्या गाई दुघ अधिक प्रमाणात देतात. त्या गाईंच्या गोमूत्र आणि शेणापासून जीवामृत बनवून सर्वप्रथम त्याची फवारणी स्वतःच्या आंबाच्या बागेमध्ये केली.
जीवामृत आणि पंचगव्याचा आंबा बागेत वापर करून पहिल्याने आंब्याच्या उत्पनात थोड्या प्रमाणात वाढ झाल्याचा त्याचप्रमाणे, फळांच्या दर्जामध्येही मोठ्या प्रमाणात फरक पडल्याचा रोहित यांनी अनुभवले.
तसेच प्राण्यांना सुद्धा शुद्ध हवा, प्रकाश, मोकळीक देणे गरजेचे असते. दोन्ही गाईंना केवळ गोशाळेत बांधून न ठेवता दिवसा मोकळ्या वातावरणात सोडल्याने सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे त्या अधिक तंदुरुस्त राहतात. परिणामी दोन्ही गाई सुरुवातीपेक्षा जास्त दूध देऊ लागल्या. यामुळे खूप फरक पडला. जीवामृत आणि पंचगव्याचा प्रयोग करून अनेक बागायतदारांनी तसेच शेतकऱ्यानीही उत्पादनामध्ये वाढ करावी. शेतकर्यांनी गोआधारित अशा प्रकारच्या शेतीचा प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पादन वाढवावे असे आवाहन रोहित पटवर्धन यांनी केले आहे.