कोरोना काळामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात सुद्धा अशा अनेक अडचणी समोर आल्या होत्या. सध्या शिक्षकी पेशा पत्करताना अनेक गोष्टीना सामोरे जावे लागण्याची मानसिकता ठेवणे गरजेचे बनले आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आणि राष्ट्रीय पात्रता चाचणी म्हणजे नेट या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी २१ नोव्हेंबरला ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा तर विद्यापीठ, कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात आपले भविष्य पाहणाऱ्या उमेदवारांसाठी या दोन्ही परीक्षा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. मात्र त्या एकाच दिवशी परीक्षेचे नियोजन केल्याने विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती परीक्षा द्यावी या बाबत संभ्रम अवस्था झाली असून, प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने टीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसतात. मात्र यंदा टीईटी आणि यूजीसी नेट या शिक्षण क्षेत्राशी संबंधित दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थीकडून केली जात आहे. याची दखल घेत शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि परीक्षा परिषदेला टीईटी परीक्षेची तारीख बदलण्याची सूचना केली आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून, ग्रामीण भागातून दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थी येत असतात. मात्र सध्या सुरु असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या संपाचा फटका या परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांना बसणार आहे.