चिपळूण तालुक्यातील पालवण ग्रामपंचायत परिसरामध्ये नळांना दूषीत व रसायनमिश्रीत पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रा.पं. पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नळाला येणारे पाणीच दूषित व लाल येत असल्याने मुंबई येथील मनसेचे पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ असलेले भरत सावर्डेकर यांनी महाराष्ट्र प्रदषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी तसेच ग्रामपंचायत, गटविकास अधिकारी यांना लेखी स्वरुपात निवेदन देऊन तक्रार केली आहे.
याबाबत सावर्डेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गेल्या पंधरा दिवसाहून अधिक काळापासून पालवण येथे ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायत नळपाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत ज्या ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन देण्यात आलेले आहे, त्या सर्व ग्रामस्थांच्या घरी नळाला रसायनमिश्रीत आणि लालसर तांबड्या रंगाचे पाणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पाण्यामध्ये काही तरी रसायन मिसळले गेले असल्याचे निदर्शनास येत होते. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याला प्रचंड प्रमाणात उग्र वास येत असल्याने हे पाणी पिण्यास सुद्धा अयोग्य असल्याने ग्रामस्थांचे आत्ता पिण्याच्या पाण्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. ग्रामस्थांनी मिळून ग्रामपंचायतीला वारंवार सांगून , लेखी निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत त्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले.
अखेर ग्रामपंचायत करत असलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन मनसे पदाधिकारी भरत मारुती सावर्डेकर यांनी रीतसर लेखी तक्रारीमध्ये ग्रामपंचायतीचा देखील उल्लेख करून, निवेदन देऊनही ग्रामपंचायत दाखल घेत नाही असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे सदर प्रकरणावर योग्य ती कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी. अशी मागणी सावर्डेकर यांनी केली आहे.