एखाद्याच्या कामाचे श्रेय ज्याचे त्याला देणे कधीही योग्य. रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाट वाहतुकीस बंद करण्यात आल्याने पर्यायी मार्ग म्हणून ओणी-पाचल-अणुस्कुरा मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती. पण हा पर्याय सर्वांसाठी वेळखाऊ आणि खर्चिक ठरला होता. आणि वाहतूक या मार्गे वळविल्यामुळे या रस्त्याची अवस्था सुद्धा अतिशय खराब झाली. त्यामुळे त्या मार्गाचे कामकाज व्हावे यासाठी अनेक पक्षांची मंडळी प्रयत्न करताना दिसत आहेत.
शिवसेना आमदार राजन साळवी आणि कॉंग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या समर्थकांत हे श्रेयाचे बॅनरयुद्ध सुरू झाले आहे. मात्र या रस्त्यासाठी निधी देणार्या ना. अशोक चव्हाण यांना दोन्ही पक्षानी निधी मंजूर केल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.
ओणी-अणुस्कुरा रस्त्याच्या दुरूस्तीला महाविकास आघाडी शासनातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री ना. अशोक चव्हाण यांनी मंजूर केलेल्या सात कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांच्या निधीचा येथील आजी-माजी आमदारांतील श्रेयासाठीचा वाद आता सोशल मिडियावरून आता रस्त्यावरील बॅनर्सपर्यंत पोहोचला आहे.
दोन्ही नेत्यांचे हा निधी आपण पाठपुरावा केल्याने मिळाला असल्याचे म्हटल्याने वादंग निर्माण झाला आहे. एकमेकांना प्रत्युत्तर देऊन झाल्यावर आत्ता पोस्टर वॉर सुरु झाले असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याचा निधी मात्र आपल्याच पाठपुराव्याने उपलब्ध झाल्याचा दावा या आजी-माजी आमदारांनी केला आहे विशेष म्हणजे विकास आघाडीतील दोन्ही घटक पक्षामध्ये यासाठी सुरू झालेल्या या बॅनर युद्धामुळे नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक होताना दिसत आहे. असे असले तरी मात्र ज्या श्रेयावरून हा वाद सुरू झाला हे त्या रस्त्याचे काम मात्र अजून सुरू करण्यात आलेले नाही.