भारतीय नौदलात चौथी पाणबुडी आयएनएस वेलाचा समावेश करण्यात आला आहे. आयएनएस वेलाचा समावेश झाल्यामुळे भारतीय नौदलाची ताकद अधिक वाढली आहे. यावेळी भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी पाकिस्तान आणि चीनच्या हालचालींवर भारत पूर्ण लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे.
कोरोना महासाथीमुळे अनेक अडचणी समोर आल्या मात्र, त्यावर मात करण्यात यश आल्याचे अॅडमिरल करमबीर सिंग यांनी सांगितले. आयएनएस वेलामुळे भारतीय नौदलाच्या ताकदीत वाढ झाली आहे. आजची गतिमान आणि गुंतागुंतीची सुरक्षा परिस्थिती पाहता, भारताच्या सागरी हिताचे रक्षण करण्यासाठी नौदलाची क्षमता वाढवण्यात आयएनएस वेला मोठी भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी म्हटले.
नौदल प्रमुख म्हणून मी सर्वांचे आभार मानतो. माझ्या कार्यकाळात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि कोरोनाच्या धोक्याचे मोठे आव्हान होते. त्यानंतरही आम्ही दुसऱ्या देशांमधून लिक्विड ऑक्सिजन आणले. त्याशिवाय त्यांना मदतही केली. चीन आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या परस्पर सहकार्यावरही आमचे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रोजेक्ट ७५ अंतर्गत सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. भारतीय नौदलात याआधी त्यातील तीन पाणबुड्या रुजू झाल्या आहेत. आज हि चौथी पाणबुडी दाखल झाली आहे. आयएनएस वेलामध्ये अॅडवान्स एकॉस्टिक सायलेन्सिंग तंत्रज्ञान आहे. रेडिएटिड नॉइस लेव्हलही कमी आहे. पाणबुडी ही हायड्रो-डायनामिक आहे. लक्ष्याचा अचूक निशाणा साधण्यासह शत्रूला मोठा धक्का देण्याची क्षमता या पाणबुडीमध्ये आहे.
त्याचप्रमाणे स्वदेशी बनावटीची आयएनएस विशाखापट्टणम या अत्याधुनिक युद्धनौकेचा रविवारी भारतीय नौदलात समावेश करण्यात आला आहे. विशाखापट्टणम’ ही विनाशिका माझगाव डॉकने तयार केली आहे. ब्राम्होस, रॉकेट लॉन्चर, बराक, अॅन्टी सबमरिन अशा अनेक सुविधांनी सुसज्ज असलेल्या आएनएस विशाखापट्टणममुळे शत्रूच्या उरात धडकी भरते. विशाखापट्टणमचे वजन तब्बल साडेसात हजार टन इतकं आहे आणि त्याची लांबी १६४ मीटर इतकी आहे. कुठल्याही रडारमध्ये सहज टिपली जाणार नाही, हे विशाखापट्टणमचे हे सर्वांत विशेष असे वैशिष्ट्य आहे.