वर्षभरामध्ये इंधन आणि सिलेंडर यांचे दर कित्येकदा वाढले असतील. त्यानंतर पुन्हा त्यांच्या किमतीमध्ये घाट होईल असे शासनातर्फे सांगण्यात येत होते परंतु, आज एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला मोठा झटकाच बसला आहे.
१ डिसेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल, डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, अशी लोकांची अपेक्षा होती. सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये झाली आहे.
घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत सध्यातरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये ही वाढ केली आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात अजून १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर २१०० रुपयांच्या पुढे आहे. दोन महिन्यांपूर्वी तो १७३३ रुपये होता. मुंबईत १९ किलोचा सिलेंडर २०५१ रुपयांचा झाला आहे. त्याचवेळी कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलेंडर २१७४.५० रुपये झाला आहे. आता चेन्नईमध्ये १९ किलोच्या सिलेंडरसाठी २२३४ रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत दिल्लीत ८९९.५० रुपये आहे. सहा ऑक्टोबर रोजी त्याची किंमत वाढवण्यात आली होती. तर मुंबईतही घरगुती सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे.
जानेवारीत मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती, ती फेब्रुवारीमध्ये ७१९ रुपये प्रति सिलेंडर करण्यात आली. १५ फेब्रुवारीला त्याची किंमत ७६९ रुपये करण्यात आली. यानंतर २५ फेब्रुवारीला एलपीजी सिलेंडरची किंमत ७९४ रुपये झाली. मार्चमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ८१९ रुपये झाली होती. जुलैमध्ये ८३४.५०, तर १८ ऑगस्टला २५ रुपयांनी पुन्हा त्यात वाढ होऊन ८५९.५० रुपये झाले. यानंतर १ सप्टेंबरला त्यात २५ रुपयांनी वाढ झाली आणि ऑक्टोबरमध्ये १५ रुपयांनी महाग झाला.