कोकणामध्ये आंबा, काजू, नारळ या फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. ठराविक सिझनमध्ये त्या त्या फळाची लागवड करून उत्पन्न घेतले जाते. नारळ आणि काजू याच्या लागवडीनंतर ठराविक वाढीनंतर फळ लागण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होते. आंबा हे हंगामानुसार येणारे फळ आहे. पण हल्ली त्याचा सुद्धा पुरवठा बारा महिने सुरु असतो. पण त्यासाठी घेण्यात येणारी मेहनत मात्र वाखाणण्याजोगी असते.
तळकोकण म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या काजू संशोधन केंद्राने उत्कृष्ट संशोधनात्मक विस्तार कार्य केल्याने या काजू संशोधन केंद्रास उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून यावर्षीचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. प्रकल्पाची वार्षिक सभा ऑनलाईन घेण्यात आली. या सभेमध्ये देशातील विविध काजू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ आपल्या नवनवीन संशोधनाचे निष्कर्ष प्रस्तुत करत असतात. ज्या काजू संशोधन केंद्राने उत्कृष्ट संशोधनात्मक विस्तार कार्य आणि इतर तत्सम उत्कृष्ट काम केले आहे, अशा काजू संशोधन केंद्राला उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून सन्मानित करण्यात येते.
यंदाच्या वर्षीची दिल्ली येथे अखिल भारतीय समन्वित, काजू संशोधन प्रकल्पाची सभा नुकतीच झाली. या सभेमध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले अंतर्गत “अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प वेंगुर्ले” या प्रकल्पास देशातील सर्वोत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिले गेले असून त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
देशभरातील एकूण ६० काजू पिकांवर काम करणा-या शास्त्रज्ञांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. देशपातळीवर काजू लागवड वाढविणे तसेच या काजूवर अजून कोणते संशोधन करणे आवश्यक आहे, याबाबत शास्त्रज्ञांनी आपले विचार मांडले. तसेच प्रत्येक जण करीत असलेल्या संशोधनाबाबत माहिती देण्यात आली.