कोकणामध्ये जास्त करून आंबा, नारळ, काजू या फळपिकांची लागवड केली जाते. आणि त्यांचे उत्पन्न सुद्धा ठराविक काळानंतर दरवर्षी मोठ्या प्रमाणात येते. कोरोना काळामुळे अनेक नोकरदार मंडळीना आपली नोकरी गमवावी लागली. त्यामध्ये अनेकानी नवीन काहीतरी शिकून किंवा ज्ञान अवगत करून काहीतरी उत्पन्नाचे साधन सुरु राहील या आशेने विविध प्रयत्न केले. अनेकानी शेती उद्योगामध्ये उडी घेऊन त्यावर विशेष संशोधन करून विविध प्रकारची पिके घेतली.
कोकणामध्ये कॉफीची लागवड होऊ शकते! असा कोणी विचारल तर कोणताही कोकणकर समोरच्याला वेड्यात काढेल. पण काही जण त्याला अपवाद ठरू शकतात, जसे कि, दापोली तालुक्यातील केळशीचे शेतकरी उदय जोशी यांनी आसाममधील कॉफीचा मळा आंबा, काजूसह नारळ, पोफळीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणामध्ये फुलवून दाखवला आहे.
२० गुंठे जमिनीवर आंतरपीक म्हणून रोबस्टा जातीच्या झाडांची लागवड त्यांनी केली. त्याच्या फळापासून चांगल्या दर्जाची कॉफी बनवली जाते. गेली चार वर्षे ते या कॉफीची फळप्रक्रिया करत असून त्यातून दरवर्षी चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न घेतात. स्ट्रॉबेरीच्या यशस्वी प्रयोगानंतर आता कोकणात कॉफीच्या लागवडीला चालना देण्याचा पर्याय पुढे येवू लागला आहे.
दापोली तालुक्यातील केळशी येथील उदय जोशी यांनी २०१५ साली कर्नाटक येथून कॉफीची फळे देणार्या रोबस्ट या जातीच्या बिया आणल्या. नारळ, पोफळीच्या बागेत आंतरपीक म्हणून त्यांनी लागवड केली. आणि त्याला मिळालेल्या यशामुळे त्याची लागवड वाढवण्यात आली आहे. वर्षाकाठी मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक लागवड केल्यामुळे वाढ होणे शक्य असल्याने सध्या कोकणातील कॉफीच्या मळ्याचा यशस्वी प्रयोगाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.