राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा वेगाने वाढता संसर्ग आणि महाराष्ट्रातील वाढते कोरोना रूग्ण या पार्श्वभूमीवर सूचक इशारा दिला आहे. तसेच महाराष्ट्राने तिसऱ्या लाटेची तयारी केल्याचंही त्यांनी नमूद केल आहे.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले कि,आमच अधिवेशन पाचच दिवसांचं होतं. या ५ दिवसात १० मंत्री आणि २० हून अधिक आमदार कोरोनाग्रस्त झाले आहेत. हे अधिवेशन आणखी वाढवलं असतं तर निम्मे मंत्री आणि निम्मे आमदार कोरोनाग्रस्त झाले असते. यावरून सगळ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या.
मी सभागृहातील एकही व्यक्ती माझ्या बाजूचा आहे की विरोधी बाजूचा आहे हा भेदभाव केलेला नाही. वारंवार सगळ्यांना आवाहन केलं आहे कि, कोरोनाच्या निर्बंधांच पालन काटेकोरपणे करा. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्ये सोबत राज्यातील नवा व्हेरीयंट ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्येमध्ये सुद्धा सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाची चिंता वाढतच चालली आहे.
मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दर आठ दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार करण्यात आलेल्या चाचणीत संबंधित तीन कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी आणि एक क्लार्क यांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी पाटील यांनी दिली आहे.
कोरोना रुग्णांची राज्यातील संख्या वाढत असताना कोरोनाचे नवे रुप ओमिक्रॉनचादेखील धोका वाढला आहे. कोरोनाची तिसरी लाट ओमिक्रॉनच्या रुपात आली असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. जनतेमध्ये कायम वावरत असणाऱ्या नेते मंडळींनाही कोरोनाची लागण झालेली दिसत आहे. हर्षवर्धन पाटील, त्यांची मुलगी अंकिता, सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे या नेत्याना कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे तरुण आम. रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना नव्या ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी फेसबुकद्वारे दिली आहे.