रत्नागिरीमध्ये पत्रकार दिनानिमित्त एक विशेष छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कार्यतत्पर पत्रकारांना विशेष पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, शासनाच्या समाजातील विविध घटकांसाठीच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकार करू शकतात. तसेच नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवले पाहिजे. रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रेय महाडिक यांना पत्रकार पै. रशिदभाई साखरकर स्मृती पुरस्कार, टीव्ही ९ चे पत्रकार मनोज लेले यांना पत्रकार गौरव पुरस्कार आणि टीव्ही ९ चे कॅमेरामन अनिकेत होलम यांना व्हिडिओ जर्नालिस्ट गौरव पुरस्कार देण्यात आला. महिला पत्रकार सौ. कोमल कुलकर्णी- कळंबटे यांना पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
माणूस आत्मकेंद्रित होत चालला आहे. फक्त माणूसच पृथ्वीवर राहू शकतो. परंतु आपण अन्नसाखळीतले घटक आहोत हे विसरत चाललो आहोत. वन्यजीव बिबट्या वस्तीत आला असे आपण म्हणतो, पण आपणच त्यांच्या वस्तीत अतिक्रमण केल्याने त्यांना वास्तव्यास काहीच राहिले नाही आहे. शासनाची योजना म्हटली की बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. पण शासन म्हणजे आपणच आहोत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होता कामा नये, ही गोष्ट पत्रकारितेतून जनतेसमोर मांडावी.
आपल्या जिल्ह्यात सकारात्मक पत्रकारिता पाहायला मिळते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. परंतु मला एक सुचवावेसे वाटते, जिल्हाधिकार्यानी आपलं एक अनुभव कथन केला. मी पाचवी, सहावीत शिकत असताना, तेव्हा गावकरी व देशदूत हे पेपर यायचे. मन घडणे, समाजाचे प्रतिबिंब पाहताना, ध्येय समोर ठेवले तर त्या बातमी, लेखातून कोणीही निष्कर्ष काढत असतो. आपल्या लेखाचा पुढे काय अन्वयार्थ निघणार आहे त्या दृष्टीने विचार करावा.
आजच्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर चोरी, अपघातांच्या बातम्या असतात. परंतु आजच्या विद्यार्थ्यांसमोर आपण विकासात्मक बातम्या अधिक प्रमाणात दिल्या पाहिजेत. विद्यार्थी गोंधळलेल्या स्थितीत आहेत. नवीन पत्रकारांनाही योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. समाजाची जडणघडण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. आदर्श कोण आहेत, आणि कोणाचा आदर्श ठेवावा याचा विचार करावा. जिल्ह्याचे वातावरण समृद्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पत्रकारांनी आता जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरण्याकरिता शासनाच्या योजना खेडोपाडी पोहोचण्यासाठी लेखणी हातात घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.