मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा आक्षेपार्ह उल्लेख ट्विटरवरून केल्याबद्दल सायबर पोलिसांनी भाजप प्रदेश समाजमाध्यम विभागाचे प्रमुख जितेन गजारिया यांना नोटीस बजावली व त्यांचा गुरुवारी जबाब नोंदवून घेतला.
रश्मी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्याप्रकरणी जितेंन गजारिया याची मुंबई पोलीस सायबर सेलकडून साडेपाच तास चौकशी करण्यात आली. आक्षेपार्ह २ ट्विटच्या संदर्भात सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी जितेंद्र गजारीया याचा संपूर्ण जबाब नोंदवून घेतला. पोलिसांना जे जे सहकार्य लागेल ते आम्ही त्यांना करू, मात्र ही आघाडी सरकारची दडपशाही असल्याचा आरोप जितेन गजारिया याच्या वकीलानी केला आहे.
रश्मी ठाकरे यांच्याबद्दल ट्विटरवर त्यांचा फोटो पोस्ट करून मराठी राबडी देवी असे ट्विट गजारीयाने केले होते. गजारीया हा भाजपचा पदाधिकारी आहे. याविरोधात तक्रार आल्याने सायबर पोलिसांनी गजारिया यांना बीकेसी येथील कार्यालयामध्ये पाचारण केले. पोलिसांकडे गजरिया याने स्पष्टीकरण दिले आहे कि, आक्षेपार्ह उल्लेख असलेल्या राबडी देवी या बिहारच्या मुख्यमंत्री होत्या व त्यांच्याशी तुलना करणे, हे आक्षेपार्ह कसे काय होऊ शकते ! राजकीय टीका-टिप्पणी करणे यामध्ये काहीही गैर नसल्याचे त्यांनी सांगितले. आणि त्यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी यापुढेही अशा राजकीय टीकाटिप्पणी होतच राहणार असे यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह शिवसेनेविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या भाजपच्या सोशल मीडिया सेलचा पदाधिकारी जितेन गजरिया याच्याविरुद्ध सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर, अखेर आता जितेन गजारिया यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत केलेल्या ट्विटबद्दल पोलिसांकडे माफी मागितली आहे.