विलीनीकरणाच्या मागणीसाठी दोन महिन्यांपासून सुरु असलेला संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. यामुळे राज्यातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यावर तोडगा निघेपर्यंत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा यासह एसटीच्या सर्व मुद्यांवर सोमवार १० जानेवारीला सह्याद्री अतिथीगृह येथे दुपारी बैठक आयोजित करण्यात आली होती.
एस. टी. कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली. सह्याद्री अतिथीगृह येथे एस. टी. कर्मचाऱ्यांचे संपाबाबत शरद पवार परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह संबंधित एस.टी.विभागातील अधिकारी, संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. एसटी च्या मागे न हटणाऱ्या संपाच्या लढ्यात आता शरद पवार यांनी मध्यस्ती करून कर्मचार्यांना समजावण्याचे आवाहन स्वीकारले आहे.
एसटी कृती समितीच्यावतीने बोलताना सांगण्यात आलं की, शरद पवार आणि अनिल परब यांच्या समवेत बैठक पार पडली. कृती समितीच्या वतीने आम्ही काही मुद्दे मांडले आहेत, पहिल्यांदा दोन महिने एवढा कालावधी संप सुरू राहिला आहे. सातवा वेतन आयोगासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिल आहे. कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होतेय. निलंबन व बडतर्फ झालेल्या कर्मचाऱ्याना एसटी सुरू झाल्यावर निर्णय घेतला जाईल असं आम्हाला सांगण्यात आले आहे. तर, बांधवांनो विचार करा, विलिनीकरणाची लढाई कोर्टावर सोपवूया आणि कामावर पुन्हा रुजू होऊया असं आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
एसटी कामगार सेनेच्या कार्यध्यक्षांनी सांगितलं की, सर्व कामगार सेनेच्या सभासदांना आवाहन करतो की, एसटी जगली तर आपण जगणार आहे. आपण सर्वांनी महामंडळाच्या कामावर रुजू व्हावं, एसटी सुरु करावी, आपल्यावर कारवाई होणार नाही याची ग्वाही मिळाली आहे. त्याचप्रमाणे विलीनीकरणाच्या मागणीसाठी तीन सदस्यांची समिती नियुक्ती केली आहे. त्यांच्या जो अहवाल असेल, तो मान्य केला जाईल,अशी विशेष भूमिकाही महामंडळाने घेतली आहे.