आघाडी सरकारने सुपरमार्केटमध्ये विक्रीसाठी वाईनला परवानगी दिल्याच्या धोरणाविरोधात बोलताना किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काही राजकीय महिला नेत्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी म्हटल होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध देखील करु शकतो, असंही बंडातात्या पुढे जाऊन म्हणाले. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यामुले आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केली असून, त्यांनी माफी मागण्याची मागणीही करण्यात येत आहे.
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी सुद्धा कीर्तनकार कराडकर यांच्या वक्तव्यावर तीव्र निषेध नोंदवला आहे. त्या म्हणाल्या हे कराडकर स्वत:ला कीर्तनकार म्हणवतात आणि अशाप्रकारे स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतात. स्त्रियांचा जाहीररित्या अपमान करतात. हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही.
माझ्या वक्तव्यानं कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो असं म्हणत त्यांनी वादावर पडता टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारु पितात असं वक्तव्य बंडातात्या यांनी साताऱ्यामध्ये केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीकेची झोड उठवली. दिवसभर उठलेल्या वादळानंतर त्यानंतर अखेर इंदापूर तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफीनामा सादर केला.
राज्यभरातून बंडातात्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर टीका केली जात होती. अखेर त्यांनी या प्रकरणी नरमाईची भूमिका घेत माफी मागून प्रकरण थांबवावंअशी मागणी केली. बंडातात्या म्हणाले की, मी ज्यांच्याबद्दल बोललो त्यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधला असून, त्यामुळे माझे वक्तव्य जर चुकले असेल तर मी माफी मागतो. आपलं चुकल असेल तर माफी मागण्यात कसला कमीपणा? माझ्या वक्तव्याचं पत्रकारांनी भांडवलं केलं, आता विषय वाढवू नये.