मागील दोन वर्षापासून, राज्यात कोरोनाच्या संकटाने जनजीवन विस्कळीत झाले होते. सिरम कंपनीने कोरोनावरील लसीचा शोध घेतल्यामुळे,आणि नागरिकांनी कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी लसीचे २ डोस देखील घेतल्याने सध्याच्या घडीला कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात शासनाला यश मिळाले आहे. साधारण दीड वर्षानंतर कोरोनाचा प्रभाव काही अंशी आटोक्यात आल्याने, जनतेने दुसरा डोस घेण्यात काही प्रमाणात दिरंगाई केली. परंतु, जेंव्हा पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या व्हेरीयंटने डोके वर काढले तेंव्हा दुसऱ्या डोससाठी जनतेची धावपळ सुरु झाली.
अनेक ठिकाणी शासनातर्फे मोफत तर काही खाजगी ठिकाणी सशुल्क लस मिळत होती. तरी सुद्धा मुंबईतील तीन खासगी रुग्णालयांमधील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या साठ्याची मुदत लवकर संपुष्टात येणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुदत संपणार असून या लसी मात्र बदलून द्याव्यात, याकरिता खासगी रुग्णालय प्रशासनाने राज्याच्या आरोग्य विभाग आणि मुंबई पालिकेला लेखी निवेदन दिले आहे.
मुदत संपायला येणाऱ्या ५० हजारांहून अधिक लस मात्रा घेऊन त्य़ा बदल्यात नवा साठा खासगी रुग्णालयांना देण्यात यावा, असे यात नमूद करण्यात आले आहे. मुंबईच्या अंधेरी येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाकडे १५ ते १६ हजार लस मात्रा शिल्लक आहेत. आणि त्यांची मुदत मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात येणार आहे. तर मुलुंड व बोरिवली येथील ॲपेक्स रुग्णालय समूहाकडे १० हजार लस मात्रा उपलब्ध असून त्यांची मुदत ५ मार्च अखेर संपणार आहे.
त्यामुळे खासगी रुग्णालयांचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की, शहर उपनगरातील खासगी रुग्णालयांकडील बराचसा लससाठा हा एक किंवा दोन महिन्यांतच कालबाह्य होणार असून, वेळीच शासनाने तो जमा करून घेऊन, त्या बदल्यात नवीन साठा उपलब्ध करून द्यावा.