रत्नागिरी जिल्ह्यातील सांगवे गावाने विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त करून रत्नागिरीचे नाव कायम उंचावले आहे. त्याचप्रमाणे, आजूबाजूच्या अनेक गावांनी त्याचा आदर्श घ्यावा असे काम त्या संपूर्ण गावाच्या एकजुटीने साध्य झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील सांगवे गावाला निसर्गाचे विशेष वरदान लाभले असून, या गावाने शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेतला असून उत्कृष्टरीत्या त्या राबवल्या देखील आहेत. त्याद्वारे आत्तापर्यंत शासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. आता या गावाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा – २ अंतर्गत १०० टक्के शोषखड्ड्यांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
सांगवे येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सांगवे ग्रा.पं. शोषखड्डा पाहणी दौरा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. इंदूराणी जाखड यांनी केला. गावातील शोषखड्ड्यांची यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. या दौऱ्याप्रसंगी त्या बोलताना म्हणाल्या की गावातील ग्रामस्थांची एकजूट व शासनाच्या विविध योजना गावात राबवण्यासाठी त्यांची असलेली धडपड पाहता सांगवे गावाला राष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी असल्याचे प्रतिपादन डॉ. जाखड यांनी केले. कोणतेही कठीण काम मन लावून केले तर त्या कामात यश नक्कीच मिळते आणि सांगवे गावातील ग्रामस्थांनी सुध्दा हेच केले आहे.
शासनाच्या अनेक योजना गावात राबवत येथील ग्रामस्थांनी इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गारही डॉ. जाखड यांनी काढले. यासाठी येथील ग्रामरोजगार सेविका पूजा शेलार यांनी घरोघरी जावून ग्रामस्थांना शोषखड्ड्याचे महत्व पटवून दिले. याचेही डाँ. जाखड यांनी विशेष कौतुक केले. मार्च महिन्यापासून प्रत्येक तालुकावार सार्वजनिक ठिकाणी श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे, असे डाँ. इंदूराणी यांनी शेवटी नमूद केले.