१२ वीच्या बोर्ड परीक्षाना ४ मार्चपासून सुरूवात झाली आहे. शनिवारी झालेल्या बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर लिक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील मालाड परिसरात एका खासगी कोचिंग क्लासमध्ये हा पेपर फुटल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून कोचिंग क्लास शिक्षकाला अटक केली आहे.
शनिवारी बारावीचा रसायनशास्त्रचा पेपर होता. परीक्षा सुरू होण्याअगोदरच मालाडच्या एका कोचिंग क्लास मधील तीन विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाली होती. जेव्हा विलेपार्लेतील साठे महाविद्यालयात एक विद्यार्थीनी परीक्षेला उशीरा आल्याने तिची चौकशी केली असता, प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झालाचा धक्कादायक प्रकार समोर आला.
या प्रकरणी खासगी कोचिंग क्लासमधील शिक्षक मुकेश यादव याला विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या तीन विद्यार्थ्यांची देखील सखोल चौकशी सुरू आहे. मात्र पेपरफुटी संदर्भात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण अद्यापही आलेले नव्हते.
मुंबईत महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची बातमी व्हायरल झाली. काही विद्यार्थ्यांच्या फोनमध्ये सोशल मिडीयावर प्रश्नपत्रिका आढळली असून ते परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचले होते, पुढे चौकशी केली असतात पेपर लिक झाल्याचे समोर आले, पोलिसांनी सूत्रे पटापट हलवली असता, मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासच्या शिक्षकाला अटक केल्याचं वृत्त समोर आले. परंतु, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अखेर यावर प्रतिक्रिया दिली असून, रसायनशात्राचा पेपर फुटला नाही, या बातम्या केवळ अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे