कोरोना काळापासून रत्नागिरीसह राज्यातील अनेक पर्यटन स्थळांवर प्रवेशास बंदी घालण्यात आली होती. जरी कोरोनाचे निर्बंध राज्यातून हटविण्यात आले असले तरी, सुद्धा अनेक पर्यटन स्थळे आणि ऐतिहासिक वास्तू आहेत त्यावरील बंदी अद्याप हटवण्यात आलेली नाही. हळूहळू कोरोनाची परिस्थिती आटोक्यात यायला सुरुवात झाल्यानंतर, आत्ता पर्यटन स्थळे पर्यटकांना खुली करण्यात आली आहेत.
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी परिसरातील थिबा राजवाड्यासमोरील परिसर दि. १ मे पासून सुर्योदय ते सुर्यास्त या कालावधीत पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात यावा, अशी सूचना पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी केली आहे. थिबा राजवाडा ते स्मारक संरक्षित आहे. सध्या स्मारकात संग्रहालय आणि कार्यालय आहे.
जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत थिबा राजवाडा परिसर सुर्योदय ते सुर्यास्त या कालावधीत खुला ठेवण्याचे सूचवण्यात आले होते. महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुराणवस्तू, शास्त्रविषयक स्थळे, अवशेष अधिनियम १०६० मधील तरतुदीनुसार संरक्षित स्मारकाचा परिसर सुर्योदय ते सुर्यास्त या कालावधीत खुले ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार संग्रहालय, कार्यालय वगळता उर्वरित परिसर महाराष्ट्र दिनापासून पर्यटकांना खुला ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विविध ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांसाठी ती एक पर्वणी ठरणार आहे.
रत्नागिरीमध्ये असणारी अनेक निसर्ग रम्य पर्यटन क्षेत्रे, समुद्र किनारा, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, पर्यटकांची पहिली पसंदी असते. जेणेकरून या ऐतिहासिक स्थळी जास्तीत जास्त पर्यटक यावे आणि आर्थिक समीकरण सुधारण्यासाठी मदत व्हावी यासाठी जिल्हा शासनाकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत.