रत्नागिरीमध्ये अनेकवेळा पैशांच्या फसवणुकी संदर्भात मारामारीच्या घटना घडलेल्या समोर येत आहेत. काही ठिकाणी सावकारीचे देखील व्यवहार चालतात, परंतु या व्यवहारामध्ये उधार घेतलेले पैसे परत न दिल्याने सावकार विविध पद्धतीने ते वसूल करताना दिसतात.
सध्याच्या काळात आर्थिक नड सगळ्यांनाच असते. उधार घेतलेले साडे तीन लाख रुपये परत न केल्याच्या रागातून तरुणास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार १५ मे रोजी दुपारी २ ते रात्री ८ वा. कालावधीत टीआरपी ते हातखंबा येथे घडली आहे. राजू मयेकर रा.थिबापॅलेस रोड, रत्नागिरी आणि अन्य दोघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात मनोज कृष्णा सातपुते वय ३६, रा.कुवारबाव, रत्नागिरी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
त्यानुसार, सातपुते यांनी ५ वर्षांपूर्वी राजू मयेकर कडून आंबा व्यवसायासाठी साडे तीन लाख रुपये उधार घेतले होते. ते पैसे परत न केल्याच्या रागातून राजू मयेकरने रविवारी दुपारी सातपुतेना टीआरपी येथे आपल्या बलेनो गाडीत जबरदस्तीने बसवून हातखंबा येथे नेले. तेथे पैशांची मागणी करून शिवीगाळ करत प्लास्टिक पाईप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान,सातपुते तेथून निघून जात असताना संशयिताच्या दोन मित्रांनी देखील तिथे येऊन त्यांना मारहाण केली. त्यानंतर सातपुतेना पुन्हा गाडीत बसवून टीआरपी येथे आणून राजू मयेकरने त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेतला. तसेच जाड दोरीने सातपुतेच्या मानेवर, पाठीवर मारून त्यांच्या मुलासमोरच त्यांना पैसे दिले नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.