केंद्रीय लोकसेवा आयोग २०२१ म्हणजेच युपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यावर्षीच्या निकालात मुलींचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. मूळ कोकणच्या परंतु सध्या मुंबईस्थित प्रियंवदा म्हाडदळकरने गुणवत्ता यादीत १३ वी रँक मिळवली आहे. कोकणकन्या प्रियंवदा म्हाडदळकरने राज्यात पहिले तर देशात तेरावं स्थान मिळविले आहे.
प्रियंवदाने व्हीजेटीआय कॉलेजमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी आयआयएम बंगळुरु येथून व्यवस्थापन शाखेत एमबीएचा शिक्षण पूर्ण केला. खासगी क्षेत्रात नोकरी करत असताना चांगल्या संधी मिळत होत्या. मात्र असे असताना सुद्धा प्रियंवदाने प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरवले व त्यासाठी मागील दोन वर्षापासून परीक्षेच्या तयारी करायला सुरुवात केली.
एमबीएची पदवी घेतल्यानंतर जर्मनीतील विद्यापीठातही काही महिने शिक्षण घेतले. इन्व्हेस्टमेंट बँकिंगसारखा खासगी क्षेत्रात मागणी असलेला विषय असूनही शासकीय सेवेत येण्याचे तिने ठरवले. प्रियवंदाने आपल्या शिक्षणासाठी घेतलेले शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी काही काळ खाजगी कंपनीमध्ये नोकरी केल्यानंतर मात्र तिने परीक्षेची तयारी सुरू केली. मागील वर्षी पुरेसा अभ्यास न झाल्याने, तिने परीक्षा दिली नाही. २०२१ साठी पुन्हा अर्ज भरला आणि देशातील अव्वल उमेदवारांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले.
प्रियवंदाने यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी वैकल्पिक विषयासाठी ऑनलाईन शिकवणीचा आधार घेतला. मात्र बाकी पूर्णपणे तिने सेल्फ स्टडीवर भर दिला आणि त्याचाच आधार घेत तिने आज हे यश संपादन केले आहे. प्रियवंदाचे वडील शासकीय सेवेत असल्याने प्रशासकीय सेवेबाबत तिला आधीपासूनच उत्सुकता होती. फक्त नोकरीच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची तिची प्रबळ इच्छा आहे. त्यानुसार तिने अभ्यासाचे योग्य नियोजन करत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून खाजगी नोकरी करून अखेर आपली स्वप्नपूर्ती केली आहे.