मंडणगड, दापोली, दाभोळ या तिन्ही ठिकणी सुकी मच्छी अतिशय उत्कृष्ट चवीची मिळते. त्यामुळे पावसाळा सुरू व्हायच्या आधी अनेक ठिकाणाहून सुक्या मासळी साठी लोक येतात. आता दोन महिने मासेमारी बंद असल्याने आणि त्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे लोक आधीच पावसाच्या ४ महिन्यांची सोय करून ठेवतात.
एकतर मागच्या वर्षांपासून आलेले कोरोनाचे संकट, त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आलेली वादळे, त्यामुळे मासेमारी साठी उपयुक्त असा काळ हा लॉकडाउन मध्येच निघून गेला. त्यामुळे दाभोळ बंदर, मंडणगड बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली आहे. १ जून ते ३१ जुलै हा कालावधी माश्यांचा प्रजोत्पादनाचा काळ असतो, त्यामुळे या काळामध्ये मासेमारी करण्यावर बंदी घातली जाते. वादळी वाऱ्यामुळे मासे सुद्धा खोल पाण्यात गेल्याने मच्छिमाऱ्याना मासेही मिळत नाहीत. आणि तौकते वादळाची संभाव्य शक्यता शासनाने दिली असल्याने मच्छी व्यवसायिकांनी आपल्या नौका आधीच किनाऱ्यावर आणून ठेवल्या आहेत. म्हणून हंगाम संपायच्या आधिच काही दिवस मासेमारी व्यवसाय बंद करण्यात आले.
मासेमारी व्यवसाय वेळेआधीच संपल्याने सुक्या मच्छीची मागणी अधिक प्रमाणात वाढली आहे. मागणी जास्त असल्याने सुक्या मासळीची किमंत सुद्धा चांगलीच वाढली आहे. त्यामुळे जरी गेल्या दीड वर्षांपासून माशांच्या व्यवसायांमध्ये तोटा सहन करावा लागला असला तरी, सुक्या मासळीचा दर चांगला मिळाल्याने मच्छी व्यवसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, कोरोनामुळे बऱ्याच जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, कित्येक लोक बेरोजगार झाल्याने एवढ्या वाढीव दरामध्ये मासळी खरेदी करताना मनाची संदिग्ध अवस्था झाली आहे. परंतु, तरीही काही दिवसांसाठी तरी पुरवठ्याला येईल एवढी सुकी मच्छी ग्राहकांनी खरेदी केली.