सार्वजनिक बांधकाम विभागाला रत्नागिरी जिल्हा व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कादांटी खोऱ्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाकडे गेल्या वर्षभरामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी, गतवर्षीच्या अतिवृष्टीत ढासळू लागलेल्या या घाटातील वाहतूक यंदा सुरक्षित सुरू ठेवण्याचे आव्हान यावर्षी पावसाळ्यात प्रशासनाला पेलावे लागणार आहे. कादांटी खोऱ्यातील अनेक गावांना पावसाळ्यात शहराशी जोडून ठेवणारा हा एकमेव घाट आहे. मात्र, गतवर्षी अतिवृष्टीच्या दरम्यान घाटाची झालेली पडझड अद्याप दुरुस्त करण्यात नसल्याने स्थानिक ग्रामस्थ यंदाही काळजीत आहेत.
खेड तालुक्यातील खोपी गावातून सुरू होणारा रघुवीर घाट निसर्गरम्य ठिकाण असून, कादांटी खोऱ्यातील शिंदी, वळवण, मोरणी, अकल्पेसह २१ गावांमध्ये पोहोचण्यासाठी दळणवळणाचे हे एकमेव पर्याय आहे. खोपी व शिरगाव या खेड तालुक्यातील दोन गावांतील काही वाड्या या घाटामुळे शहराशी जोडल्या गेल्या आहेत. हा घाट अवघड व अनेक ठिकाणी ढासळू लागल्याने धोकादायक बनला आहे.
गतवर्षी अतिवृष्टीमध्ये घाटात अनेक ठिकाणी सह्याद्रीच्या कड्यातून पाण्यासोबत दगड व माती ढासळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने खोपी गावातून सुरू होणाऱ्या या घाटातील दहा कि.मी. परिसरातील रस्त्यावर काही ठिकाणी डागडूजीचे काम केले असले तरी, अद्याप घाटात अनेक ठिकाणी रस्ता अर्धवट स्थितीत आहे. पावसाळ्यात या घाटात अनेक पर्यटक घाटाचे हिरवेगार सौंदर्य न्याहाळत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. त्यामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो.
सध्याची घाटाची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना म्हणून बांधकाम विभागाने छोटी-मोठी कामे करून घ्यावीत व नैसर्गिक आपत्तीचा सामना करत घाट सुरू ठेवण्यासाठी आवश्यक यंत्रणा घाटात ठेवावी. आम्हाला रघुवीर घाट हाच एक पर्याय आहे. औषधोपचारासह अन्य सर्वच जीवनावश्यक बाबतीत आम्ही खेड तालुक्यावर अवलंबून आहोत. त्यामुळे या घाटरस्त्याची दुरुस्ती कधी होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.